रोहिणीच्या उंबरठ्यावर खरीप तयारी
सोन्याळ :
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असतानाच रोहिणी नक्षत्राला अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे जत तालुक्यासह संपूर्ण भागातील शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. ट्रॅक्टर, बैलजोड्या आणि शेती यंत्रसामुग्रींचा आवाज पुन्हा शेत शिवारात घुमू लागला आहे. मात्र या साऱ्या हालचालींच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे, यंदा हवामान खात्याचा मान्सूनविषयक अंदाज खरा ठरणार का? हा खरा प्रश्न आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव 'मिश्र' पद्धतीचा असतो. हवामान विभाग दरवर्षी एप्रिल-मे दरम्यान मान्सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर करतो. मात्र खरंच पाऊस वेळेवर आणि पुरेसा होतो का ? याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता असते. अनेकदा सुरुवातीला वर्तवलेल्या वेळेच्या तुलनेत खऱ्या पावसाची प्रतीक्षा दोन-तीन नक्षत्रांनंतर संपते. त्यामुळेच काही तज्ज्ञ व अनुभवी शेतकरी वातावरणाच्या निरीक्षणावर आधारित पेरणीची तयारी करतात.
जत तालुक्यातील मोठ्या क्षेत्रात अजूनही कोरडवाहू शेती असल्याने शेतकऱ्यांचा मुख्य आधार नैसर्गिक पावसावर आहे. त्यामुळे मान्सून आगमनाच्या आधीच अनेक शेतकरी मशागतीस प्रारंभ करत आहेत.
यंदा तालुक्यात बाजरी तूर, मूग, सोयाबीन, उडीद आदी पिकांची लागवड होणार आहे. मान्सूनवर पेरणीचे गणित अवलंबुन असते.
हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेवर येईल असा संकेत दिला आहे. मात्र याआधीही अंदाज चुकीचे ठरल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. काहींनी अगोदरच बी-बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी केली असून पावसाच्या पहिल्या सरीसाठी प्रतीक्षा सुरू आहे. मात्र यंदाही जर पावसाचा लपंडाव सुरू झाला, तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तो पावसाकडे डोळे लावून बसला आहे.
गेल्या वर्षी पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवून पेरणी केली, पण पाऊस वेळेवर आला नाही. यंदा काळजीपूर्वक पावसाचे निरीक्षण करूनच पेरणी करणार, असे मत जत तालुक्यातील सोन्याळ येथील शेतकरी मल्लिकार्जुन पांढरे यांनी व्यक्त केले