खर्गेंची जीभ घसरली, नंतर क्षमायाचना
राज्यसभेत प्रचंड गदारोळ, कामकाजात अडथळे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात बोलताना अपशब्द उच्चारल्याने मोठा गदारोळ माजला आहे. भारतीय जनता पक्षाने खर्गे यांच्या भाषेला जोरदार आक्षेप घेत क्षमायाचनेची मागणी केली. यावेळी गोंधळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आला. खर्गे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तथापि, तेव्हढ्याने सत्ताधारी गटाचे समाधान झाले नाही. त्यामुळे अखेर खर्गे यांना क्षमायाचना करुन प्रकरणावर पडदा टाकावा लागला.
सोमवारी लोकसभेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूचे खासदार आणि त्या राज्याचे सरकार यांच्या विरोधात त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात काही उद्गार काढले होते. त्यासंबंधी खर्गे वक्तव्य करीत होते. धर्मेंद्र प्रधान हुकमशाही गाजवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ‘हम पूरी तय्यारी से आये है. और आपको क्या क्या ठोकना है, ठीक से ठोकेंगे. सरकार को भी ठोकेंगे, अशी भाषा त्यांनी बोलताना उपयोगात आणली. त्यामुळे सत्ताधारी सदस्य संतप्त झाले. केंद्रीय मंत्री जे. पी. न•ा यांनी खर्गे यांच्या विधानाला तत्काळ आक्षेप घेतला. ही भाषा सभागृहात शोभत नाही. हा सभागृहाचा अवमान आहे. ही भाषा निषेधार्ह आहे, अशी टीका त्यांनी केली. सर्वांनी खर्गे यांचा निषेध करावयास हवा. खर्गे यांनी सभाध्यक्षांचाही अपमान केला आहे. त्यांचे उद्गार सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत, अशी मागणीही जगतप्रकाश न•ा यांनी केली.
उपाध्यक्षांचे कठोर बोल
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश यांनीही खर्गे यांच्या भाषेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी खर्गे यांना त्यांचे वय आणि ज्येष्ठतेची आठवण करुन दिली. त्यांनी योग्य भाषेचा उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी खर्गे यांच्याकडून लेखी क्षमायाचनेची मागणी केली होती.
खर्गे यांची क्षमायाचना, सारवासारवी
सभागृहात प्रचंड गदारोळ उठल्याने अखेर खर्गे यांना त्यांच्या वक्तव्यासाठी क्षमायाचना करावी लागली. मी सभागृहाची क्षमा मागतो. मी सभाध्यक्षांना उद्देशून काहीही बोललो नव्हतो. माझा रोख सरकारच्या धोरणावर होता. मात्र, माझ्या भाषेचा मला खेद होत आहे. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमायाचना करीत आहे, अशी सारवासारवी करण्याचाही खर्गे यांनी प्रयत्न केला.