खर्गे यांचे वादग्रस्त विधान, सारवासारवी
पंतप्रधान मोदी यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख
► वृत्तसंस्था/ चेन्नई
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘दहशतवादी’ आहेत, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर चहूबाजूंनी खरपूस टीका झाल्याने त्यांनी नंतर सारवासारवी केली आहे. माझा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी म्हणण्याचा नव्हता. तर ते विरोधी पक्षांविरोधात दहशतवाद करतात, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण देण्यातचा त्यांनी प्रयत्न केला. ते तामिळनाडूमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले.
भारतीय जनता पक्षाशी युती केल्याच्या संदर्भात त्यांनी अण्णा द्रमुक या पक्षावर टीका केली. हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी कसा युती करु शकतो ? तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कसा हातमिळवणी करु शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्याय यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पण अद्रमुकसारखे पक्ष या पक्षासमवेत जाऊन लोकशाही दुर्बळ करीत आहेत, असे विधान या पत्रकार परिषदेत खर्गे यांनी केले, अशी माहिती आहे.
नंतर सारवासारवी
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे. यासंबंधी स्पष्टीकरण द्याल काय, असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानासंबंधात सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना घाबरवितात. ते विरोधकांना घाबरविण्यासाठी प्राप्तीकर विभाग, ईडी, सीबीआय अशा केंद्रीय संस्थांचा उपयोग करतात. ते स्वत: दहशतवादी आहेत, असे मी म्हटलेलेच नाही. पण ते विरोधकांना घाबरवितात. त्या अर्थाने ते दहशतवादी आहेत, असे माझे म्हणणे आहे, असे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तथापि, भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. खर्गे यांनी अशी विधाने करुन काँग्रेसची संस्कृती दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेली प्रगती काँग्रेसला सहन होत नाही. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या संदर्भात अद्वातद्वा विधाने करीत आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे.