‘खर्गे केवळ नाममात्र, पक्षाचे नेते गांधी कुटुंबच’
ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या वक्तव्याने नवा वाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ट नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे केवळ पक्ष चालवण्यासाठी असून ते नाममात्र आहेत. पक्षाचे खरे नेते ‘गांधी कुटुंब’च असल्याचा दावा त्यांनी केला. सलमान खुर्शिद यांनी अलीकडेच राहुल गांधींना ‘अलौकिक’ असे संबोधून आणि त्यांची तुलना प्रभू रामाशी करत वाद ओढवून घेतला होता.
सलमान खुर्शिद यांनी एका मुलाखतीत काँग्रेसचे खरे नेते ‘गांधी घराणे’ असल्याचे सांगितले. आमचा नेता गांधी परिवार आहे आणि राहील. मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ पक्ष चालवण्यासाठी असून ते फक्त पक्षाच्या कामावर लक्ष ठेऊन राहतील, असे ते पुढे म्हणाले. या वक्तव्यानंतर भाजपने देशातील काँग्रेसवर निशाणा साधला. खर्गे हे रिमोट कंट्रोल अध्यक्ष की रबर स्टॅम्प अध्यक्ष आहेत? असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याने याबाबत उघडपणे भाष्य केले नसले तरी अंतर्गत पातळीवर चर्चा सुरू आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यावषी ऑक्टोबरमध्ये शशी थरूर यांचा पराभव करून काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आले होते. खर्गे यांना 7,897 मते मिळाली, तर थरूर यांना 1,072 मते मिळाली होती.