कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा "सर्वोत्तम महाविद्यालय" पुरस्कार

03:55 PM Sep 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

15 तारीखला मुंबईत होणार पुरस्काराचे वितरण

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
कोकणातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. वेंगुर्ल्यातील शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने आपल्या बहुआयामी कार्याचा ठसा उमटवत मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय” हा बहुमान पटकावला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने ही निवड केली असून १५ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. सन १९४५ मध्ये शिक्षणमहर्षी प्राचार्य एम. आर. देसाई आणि संसदपटू बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकरी, मच्छीमार, कामगार व वंचित घटकांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्याचा संकल्प या संस्थेने केला. १९६१ मध्ये वेंगुर्ल्यात महाविद्यालयाची स्थापना झाली. पुढे १९६५ मध्ये संस्थापक बॅरिस्टर खर्डेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्या काळात कोकणात उच्च शिक्षण दुर्मीळ होते. मात्र या महाविद्यालयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी संधी मिळाली. आजही महाविद्यालय ग्रामीण भागातील शेकडो घरांमध्ये ज्ञानदीप प्रज्वलित करत आहे. सध्या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रयोगशाळा, संगणक केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, मुलींसाठी सुरक्षित वसतिगृह,तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटर अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.महाविद्यालयाने वेळोवेळी अभ्यासक्रमात नवनवीन बदल स्वीकारले. पदवी शिक्षणासोबतच इको-टुरिझम कोर्स, ग्रीन नेचर क्लब, महिला विकास कक्ष, अॅड-ऑन कोर्सेस यांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवले जाते. महाविद्यालयातील NCC युनिट विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघटन कौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा रुजवत आहे. अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील परेड, प्रशिक्षण शिबिरे, आपत्ती व्यवस्थापन मोहिमा यामध्ये चमकले आहेत. दरवर्षी NCC कॅडेट्स रक्तदान शिबिर, प्लास्टिकविरोधी जनजागृती रॅली, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन परेडमध्ये भव्य संचलन करतात. माजी कॅडेट्स भारतीय सैन्य, पोलिस सेवा आणि सरकारी सेवेत दाखल झाले असून त्यांच्या यशाने महाविद्यालयाचे नाव उजळले आहे. महाविद्यालयातील NSS विभाग हा संस्थेच्या सामाजिक योगदानाचा प्रखर पुरावा आहे. गेल्या दशकात NSS स्वयंसेवकांनी ग्रामीण स्वच्छता मोहीमा, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, गाव विकास योजना, महिला सबलीकरण कार्यशाळा, डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांत सहभाग नोंदवला आहे.विशेष म्हणजे, वेंगुर्ला नगरपालिकेसोबत राबवलेल्या स्वच्छता मोहिमा, तसेच वेटलँड दस्तऐवजीकरण प्रकल्प यामध्ये NSS विद्यार्थ्यांची उपस्थिती ठळक राहिली. ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी या स्वयंसेवकांनी केलेले प्रयत्न विद्यापीठानेही गौरवले आहेत. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांची भूमिका विशेषत्वाने अधोरेखित करावी लागेल. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी संस्थेशी कायम जोडलेले आहेत.त्यांनी शिष्यवृत्ती निधी निर्माण केला, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली, करिअर मार्गदर्शन व्याख्याने घेतली, तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयासाठी उपकरणे व पुस्तके उपलब्ध करून दिली.काही माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित प्रेरणादायी व्याख्याने देऊन तरुण पिढीला प्रोत्साहित केले.प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी सांगितले की, “आज आपण मिळवलेला पुरस्कार हा केवळ शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नव्हे तर आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणा व सहकार्याचाही फलित आहे.”महाविद्यालय केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर स्मृती इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, माजी विद्यार्थी आयोजित प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा, आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धा,वार्षिक सांस्कृतिक महोत्सव या परंपरा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवतात.संगीत, नाटक, साहित्य, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. स्थानिक लोककला व कोकणी संस्कृती जपण्यासाठी महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले आहेत.गुणवत्ता अधोरेखित करणारे निकाल राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (NAAC) तिसऱ्या चक्रात महाविद्यालयाने CGPA 3.23 सह “A” ग्रेड मिळवली. हा दर्जा मिळवताना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्यार्थी सेवा आणि समाजाभिमुख उपक्रम यांचा मोठा वाटा होता.आता मुंबई विद्यापीठाने दिलेला “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय पुरस्कार” हा त्या यशाला अधिक तेजस्वी मुकुट ठरला आहे.या कामगिरीमागे शिक्षण प्रसारक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे. विद्यमान अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कन्सिल मेंबर श्री. दौलतराव देसाई, प्रशासकीय अधिकारी श्री. पृथ्वी मोरे, संस्था प्रतिनिधि सुरेंद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यांच्या टीमवर्कमुळे आणि अध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निष्ठेमुळे आजचे यश शक्य झाले.मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदनपर पत्रात नमूद केले आहे की,''उत्कृष्टतेला परिपक्वता आणण्यासाठी वेळ लागतो आणि तुमचे महाविद्यालय असेच एक आहे. हा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांपासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित परिश्रमांची दाद आहे.”हा पुरस्कार सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, कलिना कॅम्पस, मुंबई विद्यापीठ, सांताक्रूझ (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्रभरातील शैक्षणिक संस्था या सोहळ्यात सहभागी होणार असून कोकणासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.वेंगुर्ल्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने मिळवलेला “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार म्हणजे कोकणातील ग्रामीण शिक्षणाची ऐतिहासिक कामगिरी आहे.हा बहुमान केवळ महाविद्यालयाचाच नाही तर वेंगुर्ला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article