For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानयाळे ग्रामस्थांचे तिलारी धरणाच्या पाण्यासाठ्यालगत उपोषण

10:31 AM Mar 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
खानयाळे ग्रामस्थांचे तिलारी धरणाच्या पाण्यासाठ्यालगत उपोषण
Advertisement

तिलारी धरणात काळ्या दगडांचे होत असलेले उत्खनन कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

थेट तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून सुरू असलेले उत्खनन तिलारी धरणाच्या पाणी साठ्याच्या लगत असलेल्या खानयाळे गावाच्या नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणजेच डोंगराला मोठी हानी पोहचली असून येत्या पावसाळ्यात हा डोंगर पूर्णपणे खचला जाऊन येथून धरण फुटू शकते व मोठी दुर्घटना घडू शकते हे लक्षात घेऊन या खाणींच्या विरोधात सुरू असलेल्या क्वॉरीलगत खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली.जोपर्यंत महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या क्वॉरी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे तसेच या सर्वाला जबाबदार असलेले महसूल प्रशासन, तिलारी धरण प्रकल्प अधिकारी आणि क्वॉरी चालक मालक यांच्या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.आज शुक्रवारीही असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थिती त उपोषण सुरूच आहे.

Advertisement

मागील काही दिवसापासून दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीबाबत स्थानिक ग्रामस्थ,क्वॉरीबाधित यांच्याकडून आंदोलने उपोषणे केली जात आहेत याकडे संबंधित महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून क्वॉरी चालक मालक व महसूल प्रशासन यांच्या संगतमताने बिनदिक्कतपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे.गेली 18 वर्षे शिरंगे हद्दीत काही अधिकृत परवान्याच्या नावाखाली अनधिकृतपणे काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे. उपोषण स्थळी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, नायब तहसीलदार वैशाली राजमाने यांच्याकडे उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या व अनधिकृतपणे सुरू असलेल्या क्वॉरी,वाहतूक याबाबत प्रश्नांची सरबत्ती केलीयावेळी रिंगरोडला लागून गौण खनिज उत्खननास परवानगी कोणी दिली? आमच्या क्षेत्राला लागून ब्लास्टींग केल्यामुळे आमच्या क्षेत्रात काही करता येत नाही, गौण खनिज उत्खननामुळे जर शासनाला रॉयल्टी मिळत असेल तर आमच्या गावातील लोकांचे पुनर्वसन करा,विज निर्मीती केंद्र जवळ असून दुर्घटना घडली तर काय करणार?,धरण क्षेत्रामध्ये कायम स्वरुपी गौण खनिजासाठी बंदी आणावी,ओव्हरलोडं गाडी या रस्त्याने जाऊ नये,या डोंगरातील प्राणी गावात येतात राहणे कठीण झाले आहे. शेतक-यांच्या शेतात येऊन नुकसान करतात,खानयाळे गावातील व शीरंगे गावातील शाळकरी मुले गावातील रस्यावरून ये जा करतात ओव्हर लोड गाडया सुसाट वेगाने जातात त्यामुळे धोका आहे, त्यामुळे कायम स्वरुपी शिरंगे धरण क्षेत्रातील सगळ्या गौण खनिज उत्खनन क्वॉरी बंद करा या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत त्यामुळे जोपर्यंत महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या क्वॉरी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे

आता माघार नाही-
गुरुवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, महसूल नायब तहसीलदार वैशाली राजमाने, मंडळ अधिकारी राजन गवस उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिरंगे धरण परिसरातील खाणी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविल्याचे लक्ष्मण कसेकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी आपणास अहवाल नको तर खाणी तात्काळ बंद करा आणि जर तुमच्याकडे अधिकार नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना येथे बोलवा. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवा असे उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.

उत्खननानचे मोजमाप करा-
शिरंगे गावात किती खाणी अधिकृत आहेत? असे उपोषणकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांना विचारले असता एकूण पाच खाणे असून त्यापैकी चार खाणींना परवानगी दिल्याचे श्री. कसेकर म्हणाले. यावेळी अनधिकृत असलेल्या एका खाणीवर का कारवाई झाली नाही? असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला. सर्व खाणींचे मोजमाप करून याखाणी तात्काळ बंद करा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली. आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचवू असे अधिकाऱ्यांनी उत्तर देत माघारी फिरले.

माळीणसारख्या दुर्घटनेची भीती व्यक्त-
परवानगी दिलेल्या खाणी आपण मुद्दाम पहाव्यात अशी विनंती उपोषणकर्त्यांनी केल्याने अधिकाऱ्यांनी खाणींची पाहणी केली. यावेळी धरणाला लागूनच असलेल्या खाणी अधिकाऱ्यांना दाखवल्या. धरणालगतचा डोंगर अक्षरशः उभा कापला असून भविष्यात हा डोंगर खचून माळीणसारखी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्हा अधिकाऱ्यांच्या केवळ महसूल जमा करण्याच्या हव्यासापोटी आम्हा ग्रामस्थांना प्राणास मुकावे लागणार असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. यावेळी अधिकारी मात्र निरुत्तर झाले.

Advertisement
Tags :

.