Sangli News | सांगली हादरली! सोशल मीडियावरील 'त्या' एका स्टेटसमुळे भरचौकात फळविक्रेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
खंडाळ्यात वादळी पावसाचा तडाखा; झाडे उन्मळली
सांगली : सोशल मिडियावरील एका स्टेटसमुळे संतापलेल्या युवकाने भरदिवसा फळविक्रेत्यावर कोयत्याने जीवघेणा केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील कवलापूर येथे घडली. या हल्ल्यात फळविक्रेता गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रुबेन मोहिते (रा. मोहिते गल्ली, कवलापूर) हे आझाद चौकातील गोपीनाथ हॉटेलसमोर फळविक्रीचा व्यवसाय करत होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित राहुल विजय शिंदे हा तेथे आला. राहुलच्या मेव्हणीचा स्टेटस विनोद यांनी मोबाईलवर ठेवल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरून संतापलेल्या राहुलने थेट कोयता काढत विनोदयांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही हात, कंबर आणि शरीराच्या विविध भागांवर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले.
भर चौकात झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर राहुल घटनास्थळावरून फरार झाला.दरम्यान, जखमी अवस्थेत घरी परतलेल्या विनोद यांच्या घरीही तणाव निर्माण झाला. फिर्यादीनुसार, अमोल मोहिते आणि अमोल भोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत तुला बघून घेतो अशी धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका साध्या स्टेटसवरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने कवलापूर परिसर हादरला असून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.