खानापूर तालुक्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे गरजेचे
सरकारच्या जाचक नियमांमुळे वाळू व्यवसायावरील निर्बंध कायम : वीट उत्पादक अडचणीत, शेतकरीही संकटात : शासनाने विचार करण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुका सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक मंदीच्या खाईत सापडलेला आहे. याला अनेक वेगवेगळी कारणे असून त्यावर मात करून आर्थिक मंदीच्या लाटेच्या संकटातून कसा बाहेर येऊ शकेल, हेच पाहणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्याची एकूण परिस्थिती पाहता हा तालुका औद्योगिकदृष्ट्याही मागासलेला आहे. रोजगाराभिमुख उद्योग नसल्याने तालुक्यातील युवकांना बेळगाव येथील कारखानदारीवर अवलंबून रहावे लागते. मात्र या ठिकाणी आज रोजगार म्हणावा तसा उपलब्ध नाही. त्यातच या तालुक्याचे आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या वाळू व वीट व्यवसायदेखील निर्बंधामुळे अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गही पावसाने दिलेल्या ओढीमुळे तालुक्यातील पीक परिस्थितीदेखील गंभीर बनली आहे. त्यातच जंगली प्राण्यांचा धुमाकूळ यामुळे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे खानापूर तालुक्यावर एकप्रकारचे आर्थिक संकट ओढवले आहे. याचा विपरित परिणाम तालुक्यातील बाजारपेठांवर झालेला दिसत आहे. त्यामुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे.
15 ते 20 हजार कामगार कुटुंबे बनली बेरोजगार
खानापूर तालुक्यात वाळू व्यवसाय पूर्वापार चालू होता. तालुक्यातील वाळू चांगल्या दर्जाची असल्याने याला मोठ्याप्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून चांगली मागणी आहे. पूर्वी नदी नाल्यातील वाळू मनुष्यबळावर काढली जात होती. यामुळे त्याचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नव्हता. पण कालांतराने वाळू उपसा करण्याच्या पद्धतीत बदल होऊन यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा सुरू झाल्याने याचा निसर्गावर फार मोठा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. साहजिकच याविऊद्ध तक्रारीही वाढल्या. वाळू उपशावरील निर्बंधामुळे तालुक्यातील वाळू व्यवसाय जवळजवळ बंद पडला आहे. तालुक्यात दीडशे ते दोनशे वाळू व्यावसायिक आहेत. त्या व्यवसायावर उपजीविका करणारे पंधरा ते वीस हजार कामगार कुटुंबे आहेत. पण वाळू व्यवसायावरील कडक निर्बंधामुळे वाळू व्यावसायिक तसेच कामगार कुटुंबेदेखील बेरोजगार झाली आहेत. वाळू व्यवसायावरील निर्बंधामुळे अनेक बांधकामेदेखील बंद पडली आहेत. साहजिकच बांधकाम व्यवसायावरदेखील विपरित परिणाम होऊन त्या व्यवसायाशी निगडित असलेले गवंडी, सुतार, सेंट्रींग कामगार, लोहार व संबंधित मालाचे विक्रेते, वाहतुकदार यांच्यावरदेखील एकप्रकारची कुऱ्हाड कोसळली आहे. वाळू व्यवसायावरील निर्बंधाचा परिणाम नकळत वीट व्यवसायावरही झाला आहे. खानापूर तालुक्यात जवळजवळ पाच हजार वीट व्यवसाय असून त्यावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबांची उपजीविका चालते.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी
हीच परिस्थिती आणखी काहीकाळ राहिल्यास अनेक वीट व्यावसायिक व्यवसाय बंद करण्याच्या विचारात आहेत. वाळू आणि वीट व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. जोपर्यंत वाळू व्यवसायावरील निर्बंध उठणार नाहीत, तोपर्यंत वीट व्यवसायालाही चांगले दिवस येणे कठीण आहे. दोन व्यवसायांवर ओढवलेल्या संकटामुळे संबंधीत अन्य व्यवसायांवर, बाजारावर तसेच तालुक्याच्या आर्थिक जडणघडणीवरही गंभीर परिणाम झाला आहे. यासाठी तालुक्यात वाळू व्यवसाय सुरू होणे हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसायही संकटात
तालुक्यातील शेतीचीही दुरवस्था झाली आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण तालुकाच दुष्काळी बनला आहे. तालुक्याला वऊणराजाने ऐनवेळी हात दाखवल्याने तालुक्याच्या बहुतेक भागातील पीक परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन 60 टक्के कमी होणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. नदी, नाले आणि कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावणार आहे. ऊस पिकाचीही वाढ झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच तालुक्यातील ज्या भागात पिके चांगली आहेत. तसेच यावर्षी तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात हत्तींच्या धुडगूसामुळे इतर वन्यप्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्या सर्व परिस्थितीचा विचार करता तालुक्यातील शेतकरीवर्गही मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वाळू व वीट व्यवसायाबरोबरच तालुक्यातील शेती व्यवसायही संकटातून वाटचाल करत असल्याने संपूर्ण तालुक्याची आर्थिक नाडी थंडावली आहे.