कन्नडसक्ती विरोधाच्या मोर्चाला खानापूर म. ए. समितीचा जाहीर पाठिंबा
हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार : नगरसेवक यांचा अभिनंदनाचा ठराव
खानापूर : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधात दि. 11 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाला खानापूर म. ए. समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच कन्नडसक्ती विरोधात बेळगाव महापालिकेत मराठी बाणा दाखवून कन्नडसक्तीचा निषेध करणाऱ्या नगरसेवक विजय साळुंखे, वैशाली भातकांडे, शिवाजी मन्नोळकर यांचा अभिनंदनाचा ठराव खानापूर तालुका म. ए. समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आणि बेळगाव येथे मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधात दि. 11 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याच्या नियोजनाबाबत तसेच तालुक्यात जागृती करण्याबाबत चर्चा करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. यावर माजी आमदार दिगंबर पाटील, सुधीर पाटील, जयराम देसाई, राजाराम देसाई, वसंत नावलकर, बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, भिमसेन करंबळकर यांनी मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात तसेच तालुक्यात मोर्चासंबंधी जनजागृती करण्यात यावी, असे विचार मांडले.
खानापूर शहरात मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच तालुक्यातही जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवारी गर्लगुंजी विभाग तर मंगळवारी जांबोटी विभाग, बुधवारी नंदगड आणि गुंजी विभागात जनजागृती दौरे करण्यात येणार आहेत. बैठकीला मुरलीधर पाटील, रणजीत पाटील, संजय पाटील, रमेश धबाले, मारुती परमेकर, कृष्णा मन्नोळकर, अजीत पाटील, विठ्ठल गुरव, राजू चिखलकर, अमृत पाटील, शिवाजी पाटील, रविंद्र शिंदे, एम. एन. खांबले, नागेश बोबाटे, बी. बी. पाटील, जयसिंग पाटील, डी. एन. भोसले यासह समिती कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.