For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहर परिसराला रविवारीही पावसाने झोडपले

10:38 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहर परिसराला रविवारीही पावसाने झोडपले
Advertisement

वळीव पावसाची ग्रामीण भागात दमदार हजेरी : शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह परिसराला रविवारीही जोरदार पावसाने झोडपले. रविवारी सायंकाळी सहा वाजता विजेच्या कडकडाटासह वळिवाच्या पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. शनिवारी पावसाने हजेरी लावून दिलासा दिला होता. रविवारी सायंकाळी सहा वाजता ढगांच्या गडगडाटासह एक तासभर जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारठा निर्माण झाल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाने गेल्या तीन महिन्यापासून उष्णतेमुळे होरपळलेल्या खानापूरकरांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांनाही पोषक आहे. शनिवारी सायंकाळी पाऊस झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.  रविवारी पाऊस झाल्यानंतर शहरासह परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा

Advertisement

गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नाही. सध्या नदी-नाल्यांच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. आता शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागतीची कामे खोळंबली होती. शनिवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला असून पेरणीसाठी मशागतीच्या कामाना सुरुवात होणार आहे. मात्र जोरदार वळिवाच्या पावसाची अपेक्षा शेतकरी करत आहेत. शनिवारी झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.

जांबोटी-ओलमणी परिसरात पाऊस : ऊस, मिरची पिकाला जीवदान

जांबोटी-ओलमणी परिसरात शनिवारी रात्री मेघगर्जनेसह वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे,उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच पावसामुळे या परिसरातील ऊस व मिरची पिकाला जीवदान मिळाले असले तरी रखडलेल्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या परिसरात महिन्याभरापूर्वी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर या परिसराकडे वळीव पावसाने सपशेल पाठ फिरवल्यामुळे उष्म्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. खानापूर तालुक्याच्या इतर भागात वळीव पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप जांबोटी परिसरात वळिवाने हुलकावणी दिल्यामुळे नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. दोन-तीन दिवसापासून उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली होती. रात्री पडणारे धुके व ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता होती. अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी दुपारी परिसरात विजेचा लखलखाट तसेच मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शनिवारी दुपारपासूनच पावसाचा शिडकावा सुरूच होता. रात्री मेघगर्जनेसह वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

Advertisement
Tags :

.