खानापूर शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले
प्रचंड गडगडाटासह जोरदार पाऊस, भात पिकाची मोठ्या प्रमाणात हानी
खानापूर : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तालुक्यात पावसाने जोर केला असून बुधवारी दुपारी 3 नंतर ढगांच्या प्रचंड गडगडाटासह शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने झोडपले. जवळजवळ दोन तास पाऊस झाल्याने भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेले भातपीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल खात्याने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
यावर्षी जूनपासून पावसाने शेतकऱ्यांना चांगला हंगाम दिला होता. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पिके चांगल्याच स्थितीत होती. भातपीकही उत्तमप्रकारे पोसवल्याने यावर्षी भात पिकाचा उतारा चांगल्या होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. संपूर्ण भातपीक कापण्यासाठी तयार होते. मात्र गेल्या आठ दिवसापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस होत होता. शेतकरी पाऊस पूर्णपणे जाण्याची वाट पहात होता. चार दिवसापूर्वी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. ऊन पडत होते. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गडबडीने भाताची कापणी मोठ्या प्रमाणात केली होती. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मळणी यंत्राने भात मळून देखील घेतले होते.
परंतू बुधवारी अचानक ढगांचा गडगडाट होऊन सतत तासभर जोरदार पावसाने झोडपल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापलेले भातपीक पाण्यात राहिल्याने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच उभे भातपीक पावसाच्या माऱ्यामुळे आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी तुंबून राहिल्याने पुढील काही दिवस भात कापणीचा हंगाम येणार नसल्याने भिजलेल्या भाताला कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यासाठी महसूल आणि कृषी विभागाने तालुक्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसाभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गुंजी परिसरातही भातपिकाचे नुकसान
गुंजीसह परिसरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपल्याने शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे येथील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन सुगी हंगामातच मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.
भात कापणी लांबणीवर
पावसामुळे भातकापणीत वारंवार व्यत्यय येत असल्याने भातकापणी अधिकाधिक लांबणीवर पडत आहे. वास्तविक बरीचशी कापणी या आठवड्यापूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु पावसामुळे भातकापणी करणे अशक्य होत असून सदर भातपीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सध्या शेतकऱ्यांनी भात कापणी बंद ठेवली आहे.