For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खान, खानोलकर आणि मुंबईवरील संकट!

06:50 AM Sep 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
खान  खानोलकर आणि मुंबईवरील संकट
Advertisement

मुंबई महापालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात येताच भाजपने मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांना पुढे करून मुंबईत शिवसेना खानाला महापौर करेल, मुंबईवर हिरवे संकट घोंगावत आहे असे वक्तव्य केले आहे. उर्वरित महाराष्ट्रात एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध भटके असे वाद पेटले असताना भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी इतका संकुचित प्रचार करणे आणि तोही मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना होणे योग्य नव्हते. मात्र सत्तेसाठी ‘बटेंगे तो कटेंग’ नंतर ‘हिरव्या संकटाची’ भीती दाखवणे भाजपला दुधारी तलवारीप्रमाणे घातकही ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत धुळे-मालेगाव मतदार संघातील मतदानाकडे बोट दाखवणारे आता, त्या पुढचा विखारी प्रचार करू लागले आहेत, हेच यातून दिसते.

Advertisement

मुंबई, भारताची आर्थिक राजधानी आणि सांस्कृतिक वैविध्याने नटलेले शहर, सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणावाखाली आहे. 17 सप्टेंबर रोजी वरळी येथील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केलेले वक्तव्य “उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत आली तर ‘खान’ मुंबईचा महापौर होईल आणि हिरवे संकट मुंबईवर येईल” याने राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फोडले. हे वक्तव्य केवळ शिवसेनेविरोधात नव्हते, तर त्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा स्पष्ट आशय होता. साटम यांचे वक्तव्य मुंबईच्या राजकीय संदर्भातून समजून घ्यावे लागेल. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिच्यावर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2022 च्या शिवसेना फुटीने राजकीय समीकरणे बदलली, आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना (महाविकास आघाडी) आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती-भाजप) यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. साटम यांनी ‘खान’ आणि ‘हिरवे संकट’ हे शब्द वापरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केले, ज्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. हे वक्तव्य भाजपच्या हिंदू आणि सध्या द्विधावस्थेतील मराठी मतदारांना आपल्या बाजूने करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. हे वक्तव्य करण्यामागे राज आणि उद्धव ठाकरे एक झाले आणि एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे गेले तर एक गठ्ठा होऊन मराठी मते त्यांच्या पारड्यात पडतील याची भाजपला चिंता आहे. विशेष करून मराठा आंदोलनानंतर मुंबई शहरात जे वातावरण निर्माण झाले त्यातून एक प्रकारचा संदेश मराठी माणसांमध्ये फिरू लागला आहे. तो अर्थातच भाजप विरोधात आहे. मग अशावेळी या मराठी मतात फूट पाडायची तर त्यांना एका शत्रूची भीती दाखवणे भाजपला आवश्यक होते. हा शत्रू कोण असेल? त्याची चूणूक साटम यांच्या भाषणातून दिसून आली. मुंबईत मुस्लिमांचे मतदान 20 टक्के इतके आहे. त्यात कोकणी मराठी भाषिक मुस्लिम दहा टक्के आहेत. ज्यांचा कल शिवसेना आणि मनसेकडे असू शकतो. उर्वरित दहा टक्के मुस्लिम उर्वरित महाराष्ट्र आणि देशातील विविध भागातून मुंबईत स्थायिक झालेले आहेत. ज्यांचा कोरोना संकट आणि लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकाव दिसून आलेला आहे. पारंपरिक मराठी मते आणि ही मुस्लिम मते यांच्या सोबतीला मनसे आणि उद्धव ठाकरे यांची इतर भाषकांमध्ये असलेली सहानुभूती असे समीकरण जुळून आले तर ठाकरे मुंबईची सत्ता राखू शकतील असा एक अंदाज आहे. तो भाजपला छळतो आहे.

धुळे मालेगाव लोकसभा निकालाचा प्रचार

Advertisement

लोकसभा निवडणुकीत धुळे मालेगाव मतदार संघात भाजपच्या सुभाष भामरे यांना काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभूत केले. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भामरे आघाडीवर होते तर मालेगाव मध्य मतदारसंघात बच्छाव यांना सुमारे एक लाख मतांची आघाडी मिळाली. त्यातून त्या विजयी झाल्या. काँग्रेस उमेदवाराचा हा विजय मुस्लिमांचे एक गठ्ठा मतदान करून मिळवला असा प्रचार विधानसभेला उर्वरित महाराष्ट्रभर केला गेला. वास्तविक याच लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे यापूर्वी दोन वेळा निवडून आले होते याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण होण्यात नक्कीच झाला. आता हा प्रचार भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ‘हिरवे संकट’ या नावाखाली केला जाऊ शकतो. अमित साटम यांच्या भाषणाने ते स्पष्ट झाले आहे. अर्थातच उर्वरित महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, आदिवासी आणि भटके यांच्या प्रश्नासह विविध आर्थिक प्रश्नांना सरकारकडे उत्तर नाही. त्यामुळे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण या निवडणुकीत जोरावर असणार आहे. भाजपला स्वबळावर सत्ता गाजवता येईल इतके बहुमत असताना सुद्धा दुसरे पक्ष फोडल्याने त्या फुटून बाहेर पडलेल्या मित्र पक्षांना जपण्याची वेळ आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचे ओझे वागवणे आणि त्यांना जागा सोडणे भाजपला अवघड वाटू लागले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उघडलेली आघाडी आणि ठाणे जिह्यात घेतलेले जनता दरबार, त्या विरोधात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात घेतलेली धाव, नाईक यांनी दिलेली रावणाची उपमा महायुतीत किती टोकाचा मतभेद आहे हे दाखवून देत आहे. त्यामानाने गमावण्यासारखे विरोधकांच्याकडे काही नसल्याने ते प्रत्येक घटनेत संधी शोधत आहेत. सरकारला हिंदू मतदारांचे एकीकरण करून मते आपल्या मागे ठेवायची आहेत. परंतु त्यामुळे मुस्लिम मते एकत्रितरित्या विरोधकांच्या पारड्यात जाऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या विजयाचीही संधी वाढते याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी या मुद्यावर भाजपला कात्रीत पकडत मुंबईत शिवसेनेकडून मुस्लिम महापौर होईल या आरोपाला उत्तर देताना मुस्लिम राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री (एपीजे अब्दुल कलाम, अरिफ मोहम्मद खान, मेहबुबा मुफ्ती) भाजपने केले असल्याचे वक्तव्य केले. वरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही भाजपवर टीका करताना, “खान महापौर झाला तर विकासाला चालना मिळेल,” असे ठणकावले. साटम यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतही अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठी अस्मितेला प्राधान्य देते, परंतु धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का बसेल. दुसरीकडे,  महाविकास आघाडीला विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या प्रभावामुळे अल्पसंख्याक मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढेल. मुंबई हे भारतातील बहुसांस्कृतिकतेचे प्रतीक आहे, जिथे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन समुदाय एकत्र राहतात.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.