इराणच्या सर्वोच्चपदी खामेनेई कायम
इस्रायल-अमेरिकेने अखेर काय साध्य केले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्याचे मंगळवारी जाहीर केले. 12 दिवसांपर्यंत चाललेले हे युद्ध थांबले असले तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. खासकरून या युद्धातून काय साध्य केले हा अमेरिका आणि इस्रायलसमोर प्रश्न आहे.
इस्रायलने 13 जून रोजी इराणच्या आण्विक प्रकल्पांना लक्ष्य केले होते. इस्रायलने इराणमधील अणुशास्त्रज्ञांनाही ठार केले होते. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी इस्रायलने हे हल्ले सुरू केले होते. इराणचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे नष्ट होत नाही तोवर हल्ले सुरू राहणार असल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले होते.
इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे काय?
इस्रायलच्या समर्थनार्थ 22 जून रोजी अमेरिका देखील या संघर्षात सामील झाला. अमेरिपेने स्वत:च्या अत्यंत शक्तिशाली बी-2 बॉम्बरचा वापर करत इराणच्या आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब पाडविले. या हल्ल्यानंतर इराणच्या आण्विक सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. इराणसाटी आता आण्विक कार्यक्रम पुढे नेणे जवळपास अशक्य ठरेल असे इस्रायल आणि अमेरिकेने सांगितले होते. परंतु तज्ञ आणि त्रयस्थ यंत्रणांच्या अहवालानुसार इराणच्या आण्विक सुविधा पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत.
इराणचा आण्विक कार्यक्रम या युद्धामुळे थांबणार नाही असे तज्ञांचे मानणे आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे फोर्डो, नतांज आणि इस्फहानमध्ये आण्विक केंद्रांना किती नुकसान पोहोचले हे अद्याप स्पष्ट नाही. या सुविधांना केवळ बर्हिगत स्वरुपात नुकसान पोहोचले आहे, कारण हल्ल्यानंतर रेडिएशन झालेले नाही. तर इराणने 60 टक्क्यांपर्यंत इनरिच्ड युरेनियम या हल्ल्यांपूर्वी अन्यत्र हलविले होते असेही समोर आले आहे.
खामेनेई सत्तेवरच
इस्रायलने युद्ध सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच इराणमध्ये सत्तापरिवर्तन घडविण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इराणच्या लोकांना सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरण्याचे आवाहन केले होते. तर इराणमध्ये खामेनेई यांना सत्तेवरून हटवू इच्छित असल्याचे संकेत ट्रम्प यांनीही दिले होते. विदेशात राहत असलेल्या खामेनेईविरोधकांनी देखील इराणमध्ये सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याची वक्तव्यं सुरू केली होती. तर इराणमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या आवाहनांच्या उलट स्थिती दिसली. तेहरानमध्ये लोकांनी रस्त्यांवर उतरून संकटसमयी अली खामेनेई यांच्यासोबत स्वत:ची एकजूटता दर्शविली. यादरम्यान लोकांनी खामेनेई आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स झळकविली आहेत. यातून युद्धामुळे इराणमध्ये खामेनेई यांची पकड कमकुवत होण्याऐवजी मजबूत झाल्याचे स्पष्ट आहे.
अमेरिका-इस्रायलला नुकसान का फायदा?
12 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणच्या आण्विक कार्यक्रमाला काही काळासाठी मागे ढकलण्यास यश मिळविल्याचे स्पष्ट आहे. परंतु इराणचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करणे आणि खामेनेई यांना सत्तेवरून हटविण्यास अमेरिका आणि इस्रायलला यश मिळू शकलेले नाही. म्हणजेच स्वत:च्या दोन्ही प्रमुख उद्दिष्टांना गाठण्यास अमेरिका आणि इस्रायलला यश मिळालेले नाही. तसेच इराणसोबत अमेरिकेच्या आण्विक चर्चेला या युद्धामुळे धक्का पोहोचला आहे. चर्चेकरता इराणला पुन्हा तयार करणे सोपे नसेल. दुसरीकडे जगाच्या मोठ्या हिस्स्यात इस्रायल आणि अमेरिकेला युद्ध सुरू केल्याप्रकरणी टीकेला सामोरे जावे लागतेय. खासकरून ट्रम्प यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. ट्रम्प हे सातत्याने युद्धविरोधात भूमिका मांडत होते आणि शांततेचे नोबेल स्वत:साठी इच्छित होते.