Truck Fire News : खंबाटकी घाटात ट्रकला भीषण आग, सुमारे 20 लाखांचं नुकसान
अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला
खंडाळा : खंबाटकी घाटात आयशर मालट्रकला शॉर्टसर्कीटने अचानक आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालक सकील आलम (वय 23) हा आयशर मालट्रक प्रदर्शनात असणाऱ्या स्टॉलचे साहित्य घेवून मुंबईहून बेंगलोरकडे निघाले होते.
आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातून मार्गक्रमण करीत असताना त्या मालट्रकच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्कीट होवून आग लागल्याचे समजताच चालक सकील आलम आणि साहित्याचा मालक अमनकुमार बाहेर पडले. यावेळी त्यांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला आणि वाहनासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
घटनेचे वृत्त समजताच खंडाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मस्के, महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब वंजारे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यानंतर अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. यावेळी एशियन पेंटस व वाई नगरपरिषदेचे अग्निशामक बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या कालावधीत खंडाळ्याच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जळीत वाहन बाजूला घेत असताना पुन्हा काहीवेळी खंबाटकी घाटात वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.