For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उंब्रज विभागात स्मार्ट मीटर बसवल्यास ‘खळखट्याक’

12:02 PM Jul 19, 2025 IST | Radhika Patil
उंब्रज विभागात स्मार्ट मीटर बसवल्यास ‘खळखट्याक’
Advertisement

उंब्रज :

Advertisement

उंब्रज महावितरण विभागाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत, तसेच आतापर्यंत बसवलेले सर्व स्मार्ट मीटर आठ दिवसांच्या आत काढण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र ‘खळखट्याक’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत मनसेने महावितरणला निवेदन दिले.

हे निवेदन उंब्रज महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव अमोल कांबळे, तालुकाध्यक्ष रणजित कदम, उंब्रज शहराध्यक्ष विजय वाणी आणि इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी वीज वितरण विभागाच्या सध्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement

  • स्मार्ट मीटरविरोधात वाढत्या तक्रारी

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उंब्रज परिसरात स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून “आमच्याकडे डिजिटल मीटरचे अधिकार नाहीत” असे सांगून नागरिकांवर स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहेत. ग्राहकांना डिजिटल मीटरचीच गरज असून, स्मार्ट मीटरमुळे चुकीच्या पद्धतीने जास्त बिले आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • ‘स्मार्ट मीटर’ हा ऐच्छिक विषय – सक्ती नको

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटर हा वीज ग्राहकांचा ऐच्छिक विषय आहे आणि तो सक्तीने लादता कामा नये. सध्या ज्यांचे जुने मीटर खराब झाले आहेत अथवा ज्यांना नव्याने मीटर बसवायचे आहेत, त्यांच्यावर स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जात आहेत, हे चुकीचे आहे.
तरी, आठ दिवसांच्या आत उंब्रज विभागातील सर्व स्मार्ट मीटर काढून पुन्हा डिजिटल मीटर बसवावेत, अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या नुकसानास संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

  • महावितरण कर्मचाऱ्यांची वेळेची शिस्त हरवली

महावितरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर न हजर राहण्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त झाल्या असून, हालचाल रजिस्टरवर योग्य नोंदी नसल्याचीही बाब निदर्शनास आली आहे. याशिवाय, लाखो रुपये खर्च करून महावितरणच्या आवारात निवासाची व्यवस्था करूनही बहुतांश अधिकारी-कर्मचारी मुक्कामी राहत नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वेळेत निकाली लागत नाहीत व काही प्रकरणांमध्ये दुर्घटनाही घडल्या आहेत.
त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी राहावे, अन्यथा मनसेकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

  •  स्मार्ट मीटर बसवलेले ग्राहक मेटाकुटीला

महावितरणने उंब्रज विभागातील अनेक गावांमध्ये स्मार्ट मीटर बसवले आहेत. मात्र, त्या ग्राहकांच्या वीज बिलात दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेले दोन-तीन महिने हे ग्राहक कार्यालयात हेलपाटे मारत आहेत, परंतु त्यांना दाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
महावितरणकडून सक्तीची वसुली सुरू असून, सामान्य ग्राहकांना कायद्याची भीती दाखवून स्मार्ट मीटर लादले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक नागरिक पूर्वीचे डिजिटल मीटर परत बसवण्याची मागणी करत असून, स्थानिक पातळीवर लवकरच जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.