दिल्ली स्फोटात खलिस्तानवाद्यांचा हात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या रोहिणी भागातील केंद्रीय राखीव पोलीस दल शाळेच्या नजीक रविवारी करण्यात आलेल्या स्फोटात खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘टेलिग्राम’ या वाहिनीवरुन असे प्रतिपादन करण्यात आले आहे. नवी दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात कार्यरत असणाऱ्या खलिस्तानवादी गटांकडून हा स्फोट करण्यात आला असावा अशी शक्यता दिल्ली पोलिसांनीही व्यक्त केली आहे.
काही वृत्तवाहिन्यांवर या स्फोटाचे व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध करण्यात येत आहे. या चित्रणाची सत्यासत्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलिसांनी टेलिग्राम या वाहिनीशी संपर्क केला असून अधिक माहिती देण्याची मागणी केली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही व्यक्ती स्फोटके ठेवताना दिसत आहेत. त्यांची माहिती कळविण्यात यावी, अशीही सूचना या वाहिनीला पोलिसांनी सोमवारी केली.
सर्व शक्यतांचा तपास
दिल्ली पोलीस या घटनेसंबंधी सर्व शक्यता गृहित धरुन तपास करीत आहेत. हा दहशतवाद्यांनी केलेला स्फोट आहे काय, याविषयी आताच निश्चित माहिती देणे शक्य नाही. या स्फोटात उपयोगात आणण्यात आलेली स्फोटके कमी प्रतीची होती. आरडीएक्स किंवा तत्सम उच्च प्रतीच्या स्फोटकांचा उपयोग केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हे कृत्य काही स्थानिक गुंडांचे असावे, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोट झालेल्या जागी पांढरी भुकटी सापडल्याने रासायनिक हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता काय याचीही तपासणी केली जात आहे.
प्रचंड आवाजामुळे भीतीचे वातावरण
रविवारी सकाळी रोहिणी भागात स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकू आल्याने काहीकाळ घबराट पसरली होती. या स्फोटामुळे केंद्रीय राखीव पोलीस दल शाळेच्या कुंपण भिंतीला भोक पडल्याचे आढळले होते. स्फोटामुळे दिल्ली पोलिसांची पथके आणि बाँब निकामी करणारी पथके कार्यरत झालेली होती. पोटॅशियम क्लोरेट, हैड्रोजन पॅरॉक्साईड आदी स्थानिक बाजारांमध्ये मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा उपयोग करुन बाँब बनविण्यात आले असल्याचे प्रथम दर्शनी आढळले आहे.
राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडे देणार
रोहिणी स्फोटाचा तपास राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडे (एनआयए) लवकरच सोपविला जाणार आहे. हा स्फोट दहशतवाद्यांनी घडविलेला असण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून एनआयए येत्या एक-दोन दिवसांमध्ये तपासाची सूत्रे हाती घेईल अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवारी दिली.