अमेरिकेतील भारतीय राजदुताला खलिस्तानवाद्यांची धक्काबुक्की
न्यूयॉर्कमधील गुरुद्वारामध्ये गैरवर्तनाची घटना
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
शीख फुटीरतावाद्यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूयॉर्कमधील हिक्सविले गुऊद्वारामध्ये ही घटना घडली. शीख फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित फुटिरतावाद्यांनी सिंग यांना घेरण्याचा प्रयत्न केला. हरदीपसिंग निज्जर याची हत्या आणि गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न यामुळे हे सर्वजण संतापले होते. या दोन्ही घटनांसाठी फुटिरतावादी भारताला जबाबदार धरत असून या मुद्यावर भारतीय राजदुतांना जाब विचारण्यासाठी खलिस्तानवादी तेथे पोहोचले होते. मात्र, धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर भारतीय राजदूत संधू तात्काळ गुरुद्वारातून निघून गेले.
पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अमेरिकेने अलीकडेच भारताला इशारा दिला होता. मात्र, या मुद्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, या वषी जूनमध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची पॅनडात हत्या करण्यात आली होती. नंतर पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताच्या सहभागाबद्दल संसदेत परखड भाष्य केल्याने दोन्ही देशातील तणाव वाढला होता. मात्र, भारत सरकारने पॅनडा सरकारचे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.
यापूर्वी खलिस्तानवाद्यांकडून दुतावासावर हल्ला
अमेरिकेतील भारतीय राजदुताशी गैरवर्तनाची घटना आता घडली आहे, मात्र याआधी भारतीय दुतावासावरही हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. यावषी मार्च आणि जुलै महिन्यात खलिस्तानी समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दुतावासावर हल्ला केला होता. मार्चमध्ये दुतावासाचेही नुकसान झाले होते. नंतर, भारत आणि अमेरिकन सरकारने या घटनेचा निषेध करत हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांच्याकडून निषेध
राजदूत संधू यांच्याशी झालेल्या भांडणाच्या वृत्तावर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘भारतीय राजदूत संधू यांचे वडील तेजा सिंह समुद्री यांनी स्वातंत्र्यापूर्वी गुरुद्वारासाठी ‘की फ्रंट’ लढवली होती. त्यांच्याशी असे गैरवर्तन अजिबात योग्य नसून मी त्याचा निषेध करतो’, असे सिरसा यांनी म्हटले आहे.