अमेरिकेत खलिस्तानवादी हरप्रीत सिंगला अटक
बब्बर खालसाचा दहशतवादी एफबीआयच्या जाळ्यात : भारताला मोठे यश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतातील दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेला खलिस्तानी दहशतवादी हरप्रीत सिंगला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) हरप्रीतला सॅक्रामेंटोमध्ये अटक केली. विशेष म्हणजे, हरप्रीत सिंगच्या अटकेसह अमेरिकन तपास संस्थेने खलिस्तानवाद्यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी असलेले संबंधही उघड केले आहेत.
हरप्रीत सिंग भारतीय सुरक्षा संस्थांना बऱ्याच काळापासून हवा होता, परंतु तो न सापडणाऱ्या बर्नर फोन आणि एक्रिप्टेड अॅप्लिकेशन्सचा वापर करून अटक टाळत होता. जागतिक सुरक्षेच्या धोक्याला तोंड देण्यासाठी हरप्रीतची अटक महत्त्वाची असल्याचे एफबीआयने म्हटले आहे. भारतातील कायदेशीर संलग्न कार्यालयाच्या एजंट्सनी दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत सिंग हा पंजाबसह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित असल्यामुळे त्याला अटक केल्याची माहिती एफबीआयने दिली.
खलिस्तानींचे आयएसआय कनेक्शन उघड
एफबीआयने आपल्या निवेदनात थेट पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा उल्लेख केला आहे. हरप्रीत सिंग दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंधित होता आणि त्याने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला होता, असा दावा एफबीआयने केला आहे. सिंगवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि खलिस्तानी दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल सोबत सहकार्य केल्याचा संशय आहे.
अमेरिकेत भारतात हवा असलेला खलिस्तानी दहशतवाद्याला अटक होणे हे अमेरिकेच्या भारतविषयक धोरणातील बदल म्हणून पाहिले जात आहे. आयएसआयशी संबंधित बब्बर खालसा सदस्य हरप्रीत सिंगच्या अटकेनंतर अमेरिका इतर खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करेल का, असा प्रश्न संरक्षण तज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या इतर 10 फरार दहशतवाद्यांवर भारतीय न्यायालयांनी अटक वॉरंट जारी केले आहे