खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्ला कॅनडात ताब्यात
गोळीबार प्रकरणात कारवाई : भारतासाठी ‘मोस्ट वॉन्टेड’
► वृत्तसंस्था/ ओटावा
खलिस्तानी दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अर्श डल्ला याला कॅनडामध्ये एका गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पत्नीसह कॅनडामध्ये राहत होता. तेथून भारतविरोधी दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया केल्या जात होत्या. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अशीही त्याची ओळख होती. तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीशीही त्याचे निकटचे संबंध आहेत. त्याचे नाव एनआयए, दिल्ली पोलीस आणि पंजाब पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.
अर्श डल्ला हा खलिस्तानी दहशतवादी आहे. त्याचे 700 हून अधिक शूटर्स भारतात सक्रिय असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात शेजारील देशात झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी तो एक आहे. कॅनेडियन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या तपास यंत्रणा आणि हॅल्टन रीजनल पोलीस सर्व्हिस (एचआरपीएस) गोळीबार प्रकरणाची चौकशी करत आहेत. 27 किंवा 28 ऑक्टोबर रोजी मिल्टन शहरात सशस्त्र चकमकीत त्याच्या संशयास्पद सहभागानंतर डल्लाच्या अटकेची माहिती मिळाल्याची पुष्टी भारतीय सुरक्षा एजन्सींच्या सूत्रांनी केली आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्श डल्ला हा भारतात विविध गुन्हेगारी कारवायांसाठी वाँटेड आहे. सध्या भारतीय अधिकारी कॅनडामधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच अधिक माहितीसाठी पॅनडाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. डल्ला हा खलिस्तानी टायगर फोर्सचा कार्यवाहक प्रमुख असून ठार झालेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
पॅनडामध्ये 27-28 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात अर्श डल्लाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याप्रकरणीच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा एजन्सी या बातमीशी संबंधित आणखी तथ्य शोधण्यात व्यग्र आहेत.