कॅनडात आहे खलिस्तान्यांची समस्या
भारतावर टीका करणाऱ्या ट्रूडो यांची अखेर कबुली
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडातील सर्व हिंदू हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक नाहीत, अशी टिप्पणी करतानाच, कॅनडात खलिस्तानवादी शीख आहेत, अशीही कबुली कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिली आहे. भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकांसमोर ओटावा येथील पार्लमेंट हिल येथे दीपावली उत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी कॅनडातील शीख फुटिरतावाद्यांचा उल्लेख प्रथम केला. त्यामुळे त्यांची विधाने महत्त्वाची मानली जात आहेत. भारताविरुद्धची आपली ताठर भूमिका त्यांनी सोडली नसली तरी, खलिस्तानवाद्यांचा उल्लेख करण्याची नरमाई त्यांनी दाखविली आहे.
कॅनडात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि त्यांच्या सरकारचे समर्थक आहेत. तथापि, ते कॅनडातील सर्व हिंदूंचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. त्याचप्रमाणे कॅनडात खलिस्तानवादी शीखही आहेत. पण या देशातील सर्व शीख खलिस्तानचे समर्थन करत नाहीत, अशी दोन्ही विधाने त्यांनी या कार्यक्रमात केल्याने त्यांच्या मनातील गोंधळच स्पष्ट झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
भारताचा पुन्हा प्रहार
ट्रूडो यांच्या नव्या विधानांचाही भारताने खरपूस समाचार घेतला आहे. कॅनडात खलिस्तानवादी शीख आहेत, ही कबुली त्यांनी दिल्याने भारताचे म्हणणे खरे ठरले आहे. भारताने नेहमीच कॅनडातील खलिस्तानवाद्यांसंबंधी कॅनडाला सावध केले आहे. तथापि, आजपर्यंत कधीही कॅनडाच्या भूमीवर फुटिरतावादी आहेत, हे त्या देशाने मान्य केले नव्हते. मात्र, आता परिस्थिती अशी आली आहे, की ही बाब त्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मान्य करावी लागली आहे. आता ट्रूडो यांनी या खलिस्तानवादी फुटिरांचा बंदोबस्त करावा, अशी टिप्पणी भारताने केली.
पुरावे नसल्याचेही विधान
कॅनडातील खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात भारत सरकारचा हात आहे, असा अश्लाघ्य आरोप ट्रूडो यांनी केला होता. त्यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांनीही असा आरोप केला होता. तथापि, या आरोपांसंबंधी कोणताही ठोस पुरावा आपल्याकडे नाही, अशी कबुलीही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. तथापि, अशी कबुली देऊनही त्यांनी भारतावर टीका करण्याचे सत्र थांबवले नव्हते. त्यामुळे भारतावर आरोप करण्यामागे त्यांचे त्यांच्या देशातील राजकारण कारणीभूत असावे, असा प्रत्यारोप भारतानेही त्यावेळी केला होता.