खलिस्तान्यांची कॅनडाच्या नागरिकांना धमकी
वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडातील हिंदूंनी हा देश सोडून जावे, अशी धमकी देणाऱ्या कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी आता कॅनडाच्या नागरिकांनाच धमकी दिली आहे. कॅनेडियन नागरिकांनी हा देश सोडून ब्रिटन किंवा युरोपातील इतर देशांमध्ये जावे, अशी धमकी खलिस्तानवादी देत असल्याचा व्हिडीओ सध्या प्रसारित होत आहे. त्यामुळे खलिस्तानवाद्यांना पोसणारा कॅनडा देश आता त्यांच्यामुळेच धोक्यात येणार असे दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमधून अनेकानी कॅनडामध्ये स्थलांतर केले होते. याच लोकांनी कॅनडा देश वसविला आहे. तथापि, खलिस्तानवाद्यांच्या दृष्टीने हे सर्व कॅनेडियन नागरीक घुसखोर असून त्यांनी हा देश सोडून आपल्या मूळ देशांमध्ये, म्हणजेच ब्रिटन किंवा युरोपातील देशांमध्ये परत जावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिरवणुकीत घोषणा
कॅनडाच्या नागरीकांनी ब्रिटन किंवा युरोपातील इतर देशांमध्ये जावे अशी घोषणा कॅनडात नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीखांनी एका मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरववणुकीत खलिस्तानवादी युवकांनीही शिरकाव केला होता. त्यांच्यापैकी काही युवकांनी या घोषणा दिल्या होत्या.
भारत प्रत्यार्पणाची मागणी करणार
कॅनडात अटक करण्यात आलेल्या अर्शदीपसिंग या खलिस्तानी दहशतवाद्याच्या प्रत्यार्पणाची मागणी कॅनडाकडे केली जाणार आहे. अर्शदीपसिंग डल्ला याला 28 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. कॅनडाच्या अंटोरिओ शहरात एका गोळीबार प्रकरणात अर्शदीपसिंग डल्ला याला अटक करण्यात आली आहे. डल्ला हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारताने त्याला फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर भारतात 50 गुन्हेगारी प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली आणि दहशतवादी हिंसाचार घडविणे असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती याआधीच भारत सरकारने कॅनडाला पुरविली आहे.