खलीदा झिया यांच्यावर अंत्यसंस्कार
एस. जयशंकर यांची तारिक रहमान यांच्याशी भेट
वृत्तसंस्था / ढाका (बांगला देश)
बांगला देशच्या दिवंगत माजी नेत्या खलीदा झिया यांच्या पार्थिवावर बांगला देशची राजधानी ढाका येथे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. या प्रसंगी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलीदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्यासाठी दिलेले सांत्वनपर पत्र जयशंकर यांनी रहमान यांना दिले. त्यांनी पाकिस्तानच्या संसद अध्यक्षांचीही भेट घेतली. अंत्यसंस्कारानंतर आता परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर भारतात परतले आहेत.
खलीदा झिया यांचा मृत्यू प्रदीर्घ आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी ढाका येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारसाठी ढाका येथे लाखो लोक जमले होते. अनेक देशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. झिया यांच्या पार्थिवाचे दफन दिवंगत पती झिया उर रहमान यांच्या कबरीशेजारीच करण्यात आले आहे. खलीदा झिया या त्यांच्या राजकीय कार्यकाळात तीन वेळा बांगला देशच्या प्रमुख नेत्या राहिल्या आहेत. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याशी भेट झाली होती. तारिक रहमान हे झिया यांचे पुत्र 17 वर्षे ब्रिटनमध्ये विजनवासात होते. ते बांगला देशला परतल्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्या मातोश्री खलीदा झिया यांचा मृत्यू झाला होता. बांगला देशात 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत असून रहमान हे आपल्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत.
पाकिस्तानच्या संसद अध्यक्षांची भेट
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस, जयशंकर यांनी पाकिस्तास संसदेचे अध्यक्ष अयाझ सादिक यांची भेट घेतली. ही भेट औपचारिक होती, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांच्या दृष्टीने कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. झिया यांच्या अंत्यसंस्काराला नेपाळचे विदेश व्यवहार मंत्री बालानंदा शर्मा, भूतानचे विदेश व्यवहार मंत्री ल्योंपो डीएन धुंगेल, श्रीलंकेचे विदेश व्यवहार मंत्री विजिथा हेरथ आणि मालदीवचे उच्च शिक्षण मंत्री अली हैदर अहमद आदी नेते उपस्थित होते. खलीदा झिया यांच्या नेतेपदाच्या काळात त्यांचे भारताशी विशेष मित्रत्वाचे संबध नव्हते. मात्र, नंतर त्यांच्या भूमिकेत परिवर्तन झाले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात असे.