For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खलिदा झिया यांचे निधन

06:45 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
खलिदा झिया यांचे निधन
Advertisement

बांगला देशच्या माजी प्रमुख, बीएनपीच्या नेत्या

Advertisement

वृत्तसंस्था / ढाका (बांगला देश)

बांगला देशच्या माजी प्रमुख आणि बांगला देश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या (बीएनपी) नेत्या खलिदा झिया यांचे निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या आसपास येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ही माहिती त्यांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

बांगला देशात 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. झिया यांचा पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज होत असतानाच त्याला खलिदा झिया यांच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. झिया यांची फुप्फुसे आणि हृदय सांसर्गग्रस्त झाल्याने त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अनेक देशांमधून तज्ञ डॉक्टर्स आणण्यात आले होते. तथापि, उपचारांचा उपयोग झाला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

होते अनेक विकार

खलिदा झिया या मृत्यूसमयी 80 वर्षांच्या होत्या. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अनेक विकार होते. लीव्हर सिरोसिस, मधुमेहृ संधीवात आणि मूत्रपिंडाचे विकार यांनी त्या ग्रस्त होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवावे लागले होते. तरीही प्रकृती स्थिर असताना त्या राजकारणात सक्रीय होत्या. अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची दृष्टीही अधू झाली होती. अखेर याच विकारांनी उचल खाल्ल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती देण्यात आली आहे.

आज अंत्यसंस्कार

खलिदा झिया यांच्या पार्थिवावर आज बुधवारी ढाका येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर त्यांना अनेक जागतिक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे जगाने एक उच्च आणि थोर राजकीय व्यक्तिमत्व गमावले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली असून खलिदा झिया यांच्या कुटुंबियांना त्यांनी शोकसंदेश पाठविला आहे. 2915 मध्ये ढाका येथे आपली त्यांच्याशी भेट आणि सौहार्दपूर्ण चर्चा झाली होती, ही आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात नोंद केली आहे.

अपघातानेच राजकारणात...

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या साध्या गृहिणी होत्या. त्यांचे पती आणि बांगला देशचे राष्टाध्यक्ष यांची 1981 मध्ये हत्या करण्यात आली होती. झिया उर रहमान यांनी बांगला देश नॅशनॅलिस्ट पक्षाची स्थापना केली होती. तथापि, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पक्ष विभाजित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पक्ष एकत्र राखण्यासाठी त्यांना राजकारणात प्रवेश करावा लागला. मात्र, एकदा राजकारण हे क्षेत्र आपलेसे केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

लष्करी शासन घालविण्यात भूमिका

1981 मध्ये झिया उर राहमान यांची हत्या झाल्यानंतर बांगला देशात लष्करी शासन स्थापित झाले. त्याने लोकशाही संपुष्टात आणली. त्यामुळे खलिदा झिया आणि त्यांचा बांगला देश नॅशनल पार्टी हा पक्ष यांनी लष्करशाहीविरोधात लढा उत्ता केला. दुसऱ्या बाजूला त्यांच्या प्रतिस्पर्धी शेख हसीना आणि त्यांचा पक्ष अवामी लीगही लष्करशाही विरोधात आंदोलनात उतरले होते. या आंदोलनांच्या दबावामुळे बांगला देशातील लष्करशाही समाप्त झाली आणि लोकशाही पुन्हा स्थापित झाली होती. अशा प्रकारे या दोन प्रतिस्पर्धी महिलांनी बांगला देशला लष्कारशाहीपासून मुक्त केले होते आणि लोकशाहीच्या मार्गावर आले होते. 1982 नंतर आतापर्यंत शेख हसीना आणि खलिदा झिया यांनी आलटून पालटून बांगला देशची सूत्रे हाती घेतली होती. त्यामुळे हे दोन महिलांवर चालणारे राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. या दोन महिलांमधील राजकीय स्पर्धा जगाच्या चर्चेचा विषय बनली होती. खलिदा झिया यांची धोरणे धार्मिक कट्टरतावादाकडे झुकणारी होती.

पहिल्या महिला नेत्या

1991 मध्ये त्यांच्या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळविले होते. त्यानंतर त्या या देशाच्या प्रथम महिला सर्वोच्च नेत्या बनल्या होत्या. 1996 मध्येही त्या प्रमुख बनल्या होत्या. पण त्यांचे सरकार अल्पजीवी झाले. 2001 मध्ये त्यांनी पुन्हा निर्णायक बहुमत मिळविले होते. तथापि, नंतरच्या काळात त्यांना विविध विकारांनी ग्रासल्यामुळे त्यांचा सक्रीय राजकारणातला सहभाग कमी होता.

अनेक कायदेशीर प्रकरणे

सत्ताकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. 2006 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारागृहाची शिक्षा ठोठावली गेली. नंतर अनेक वर्षे त्या कारागृहात होत्या. कारागृहात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. 2008 च्या निवडणुकीपूर्वी त्यांची सुटका झाली. पण त्या नंतर कधीच सत्तेवर आल्या नाहीत. पुढच्या काळात अनेक आरोपांमध्ये त्यांना शिक्षा केल्या गेल्या.

भारतविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध

शेख हसीना आणि खलिदा झिया यांची धोरणेही परस्परविरोधी होती. खलिदा झिया यांच्या नेतेपदाच्या काळात त्यांनी अनेकदा भारताच्या विरोधात भूमिका घेतली होती. भारतापेक्षा त्या पाकिस्तानकडे अधिक झुकलेल्या आहेत, असे आरोपही त्यांच्यावर अनेकदा झालेले आहेत. तथापि, त्यांनी ते नाकारले होते.

बांगला देशात पोकळी

ड खलिदा झिया यांच्या निधनामुळे बांगला देशच्या राजकारणात पोकळी

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनापर संदेश

ड झिया यांचे निधन हा बीएनपीला निवडणुकीपूर्वीच बसलेला मोठा धक्का

ड त्यांच्या निधनावर जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केली हळहळ

Advertisement
Tags :

.