Khajinyavachra Ganpati Kolhapur: 135 वर्षांची अखंड परंपरा असलेला खजिन्यावरचा गणपती
अंबाबाईच्या मंदिरात खजिन्याजवळ गणेश चतुर्थीला छोट्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीवरील सर्व अलंकार पुजाऱ्यांनी सकाळी ताब्यात घ्यायचे. आणि रात्री शेजारती झाल्यावर हे अलंकार खजिनदाराच्या ताब्यात द्यायचे, ही अंबाबाई मंदिरातील पिढ्यान पिढ्यांची पद्धत आहे. रात्रभर मंदिरात एकटे राहून शंकर मामा काळे हे 1890 च्या सुमारास मंदिराच्या या दागिन्यांची व्यवस्था पाहायचे.
त्यावेळी अंबाबाईच्या मंदिरात खजिन्याजवळ गणेश चतुर्थीला छोट्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची. शंकरमामा काळे यांनी या गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला सार्वजनिक स्वरूप दिले. आणि खजिन्यावरचा हा गणपती अंबाबाईचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला. आता 135 वर्षे उलटली हा गणपती अंबाबाईचा गणपती म्हणून आपली वेगळी ओळख जपत आहे.
दिरात देवीच्या दागिन्याचा जो खजिना आहे तेथे हा गणपती बसवला जात होता. काही वर्षांनी तो बाहेर सरस्वतीच्या मंदिराजवळ आला. तिथून पुढे त्याला गरुड मंडपात स्थान मिळाले. या गणपतीच्या आगमनाला हत्ती, घोडे, उंट, हुजरे असा लवाजमाही मिळू लागला.
सजावटीसाठी काचेच्या हंड्या, पताका, कमानी, सिंहासन हे देखील मिळू लागले. शंकरमामा काळे यांच्या सोबत मोरबा दीक्षित, हरिभाऊ सेवेकरी, हवालदार खांडेकर व मुनिश्वर परिवारातील मंडळीही सहभागी होऊ लागली. गरुड मंडपाच्या तुलनेत ही गणेश मूर्ती थोडी लहान वाटू लागली.
त्यामुळे मूर्तीची उंची वाढवण्यात आली. उत्सवात सुसूत्रता यावी म्हणून विश्वनाथ बावडेकर, शंकरराव मेवेकरी, वसंतराव वाघ, नारायण किणीकर यांनी पुढाकार घेऊन घेतला. त्यांनी अंबाबाई गणेश भक्त मंडळ स्थापन केले व खजिन्यावरच्या या गणपतीच्या सोहळ्याचे स्वरूप अधिक व्यापक झाले.
या गणपतीचा सोहळा म्हणजे प्रथा परंपरेचे काटेकोर पालन केले जाते. पहाटे सनई चौघडा वादन होते. मिरवणुकीत ही मूर्ती ज्या रथावर ठेवली जाते, तो रथ भाविक ओढत नेतात. ही मूर्ती मिरवणुकीत आमच्या पुढे का किंवा आमच्या मागे का याबद्दल मिरवणुकीत कधीही वाद होत नाही.
ही मूर्ती विसर्जनाला बाहेर पडली की मूळ विसर्जन मिरवणूक काही वेळ थांबते आणि अंबाबाईच्या या मूर्तीला मिरवणुकीत वाट दिली जाते. मिरवणुकीत एक मशाल कायम पेटती असते आणि मिरवणूक सुरू असेपर्यंत या रथावर घंटानाद ही सुरू असतो.
कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची जी काही वैशिष्ट्यो आहेत, त्या वैशिष्ठ्यात अंबाबाईच्या या गणपतीचा समावेश आहे आणि प्रत्येक गणेश उत्सवात ही परंपरा अगदी आस्थेने जपली जाते. रथात ठेवलेली ही मूर्ती ओढत नेण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होतात. मोरयाचा गजर करत रथ ओढत नेतात. रथ ओढून नेण्याची आपल्याला संधी मिळाली हा आनंदाचा क्षण मानतात आणि रथ ओढणे म्हणजे कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची परंपराच पुढे नेतात