खजाना राशिभविष्य
16-9-2026 ते 22-9-2026
मेष
कष्टाला पर्याय नाही. पण कष्टाचे फळ मिळतेच. त्यामुळे आपण केलेल्या प्रामाणिक कष्टाचे फळ आपल्याला मिळेलच. देवावर विश्वास ठेवा. गुप्तशत्रुंचा परस्पर बीमोड होईल आणि नोकरीमध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळेल. सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. मातेचा आशीर्वाद व सहवासाचा आनंद मिळेल. भूलथापांना बळी पडू नका. वडील भावंडांचा सहवास मिळेल.
उपाय: दशरथकृत शनैश्चर स्तोत्र शनिवारी वाचा.
वृषभ
वाणीवर संयम असू द्या. हा आठवडा कुटुंबाबरोबर मजेत घालवाल. लहान भावंडांचा सहवास व त्यांच्याबरोबर छोट्याशा सहलीचा आनंद लाभण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक स्थळीसुद्धा कदाचित जाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. किंवा अभ्यासात प्रगती होईल. मात्र गुप्त शत्रूपासून सावध रहा. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
मिथुन
आत्मविश्वास वाढलेला आपल्यालाच जाणवेल. नेतृत्वक्षमता वाढण्याची शक्यता आहे. पण रागावर नियंत्रण ठेवा. जमिनीचे काही व्यवहार चालू असतील तर आपल्या तर्कबुद्धीने त्यात यश मिळण्याचा संभव आहे. जोडीदाराबरोबर हा आठवडा आनंदात घालवाल. नोकरीच्या ठिकाणी थोडे कष्ट होतील पण कामातला आत्मविश्वास सर्वांना कळेल.
उपाय : शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन करा.
कर्क
परदेशगमनाची संधी मिळेल. अथवा परदेशातून व्यापाराची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायात असाल तर प्राप्ती चांगली होईल. तुमच्या कामावरील विश्वास वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक प्रगती होईल. मात्र बोलण्यामध्ये आढ्याता येऊ देऊ नका. समोरच्या माणसाचे मन दुखावेल असे बोलू नका. वाहन जपून चालवा.
उपाय: सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्या.
सिंह
कामात व बोलण्यातला वाढलेला आत्मविश्वास इतरांनाही जाणवेल. आपल्या वाणीमध्ये मधुरता येईल. त्यामुळे समाजात त्याची छाप पडून बराच जनसंपर्क साधाल. त्याचा तुम्हाला चांगलाच फायदाही मिळेल. तुम्ही करत असलेल्या कामामध्ये किंवा नोकरीत असाल तर तेथील सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.
कन्या
धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. वाणीमध्ये मधुरता येईल. या आठवड्यात वडील भावंडांच्या गाठीभेटी होतील. सभा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. जे आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. पण जर दैनंदिन व्यवसाय असेल तर यांना मात्र खूप कष्ट करावे लागतील. खूप प्रयत्नांती यश मिळेल. वाहन जपून चालवा.
उपाय : गणपती अथर्वशीर्ष म्हणा.
तुळ
या आठवड्यात मन थोडे चंचल राहील. कोणताही निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होण्याची शक्यता आहे. अशावेळी शांत राहून पूर्ण विचारांती निर्णय घ्या. जमल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. नोकरीत असाल तर सहकाऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. स्वत:चे काम दुसऱ्यावर सोपवू नका. भूलथापांना भुलू नका. सांभाळून रहा.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
वृश्चिक
विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविण्यासाठी जास्त कष्ट घ्यावेत. तरच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचाल. घर, जमीन अथवा जागेसंदर्भात काही अडचणीत अडकला असाल तर त्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. पण प्रयत्न मात्र प्रामाणिक हवेत आणि कागदपत्रांची शहानिशा करणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
उपाय: मंगळवारी संकटनाशक गणेशस्तोत्र म्हणा.
धनु
रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जे काम हाती घ्याल, ते चोख कराल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण पैसा योग्य मार्गाने मिळत असेल तर स्वीकारा. वडील भावंडे व मित्रपरिवार यांच्या सहवासात हा आठवडा छान जाईल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचे कौतुक होईल आणि यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल.
उपाय : ॐ गं गणपतये नम: याचा जप करा.
मकर
अध्यात्मात आपली रुची वाढण्याची शक्यता आहे. आपली त्यात प्रगती होऊन समाजात मान मिळण्याचीही शक्यता आहे. या आठवड्यात सभा समारंभात जायची संधी मिळेल. ज्यातून आपल्याला लाभच होईल. उंची भेटवस्तू मिळतील. आपल्या नोकरीच्या ठिकाणीदेखील आपले काम छान होऊन वरिष्ठ आपल्यावर खूष होण्याची शक्यता आहे.
उपाय : गुरुवारी दत्तदर्शन घ्या.
कुंभ
हा आठवडा आपल्याला सांभाळून राहण्यास सांगतो आहे. आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे ‘मी सगळीच कामे एकावेळी करू शकतो’ या कल्पनेत स्वप्न रंगवाल. पण सांभाळा. एकावेळी सगळीच कामे होऊ शकणार नाहीत. तो कदाचित भ्रम असेल. यश प्राप्तीसाठी खूप कष्ट घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
मीन
या आठवड्यात कदाचित आपल्याला आळसावल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. पण आळस झटकून कामाला लागा. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. प्रयत्न केलात तर यश नक्की तुमच्या हातात असेल. अभ्यासात मन लागेल. वाहन खरेदी किंवा जागा खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्या दिशेने पावले उचलण्यास हरकत नाही.
उपाय : दशरथकृत शनैश्चर स्तोत्र म्हणा.