For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:01 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

(बुधवार, दि. 22 ते मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 पर्यंत)

Advertisement

मेष

कुटुंबातील आपला मान वाढेल. सर्वजण तुमच्या शब्दांचा, इच्छांचा, सल्ल्यांचा मान ठेवण्याची शक्यता आहे. पण हा तुमच्याबद्दलचा त्यांचा आदर डोक्यात जाऊ देऊ नका. त्यांच्याशी तुमचे वागणे, बोलणे यामध्ये थोडा दादागिरीचा वास येण्याचा संभव आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी किंवा इतरांशी थोडे नरमाईने बोला.

Advertisement

उपाय : गाईला चारा-पाणी द्या.

वृषभ

आपल्या कामातील नीटनेटकेपणा आणि बिनचूकपणा पाहून आपले वरिष्ठ आपल्यावर खूश होण्याची शक्यता आहे. लहान भावंडांचा सहवास मिळून छोट्या प्रवासाचे बेत आखाल. प्रवासाचे नियोजन करतानासुद्धा सर्वांना आपल्यातील नेटकी नियोजनपद्धती दिसण्याचा संभव आहे. आनंद घ्या.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

मिथुन

एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडचिड होण्याचा संभव आहे. स्वत:ला सांभाळा, होणारे चुकत नसते त्यावर चिडून काही उपयोगाचे नाही. आईची काळजी घ्या. तिच्या सहवासाचा आनंद लुटा, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीच्या प्रयत्नात असाल, तर पूर्ण कागदपत्रांची शहानिशा झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका.

उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळावर केशरी गंध लावा.

कर्क

विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. शाळांना सुट्या पडल्या आहेत. आपली मुले काय करतात याकडे लक्ष द्या. प्रलोभने भरपूर असतात. त्यांना योग्य मार्ग दाखवा. एकंदरीत हा आठवडा आपल्याला चांगला जाईल, असे दिसते.

उपाय: शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

सिंह

आपल्याला कष्टापासून सुटका नाही. पण कष्ट करताना स्वत:ची तब्येत सांभाळून करा. छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारीला तोंड द्यावे लागणार आहे. सांभाळून रहा. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा. हरवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या नोकरवर्गाकडून आपल्याला फारसे सहकार्य मिळू शकणार नाही.

उपाय : सकाळी सूर्याला अर्ध्य द्या.

कन्या

जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. पण म्हणून उगाच त्याच्याशी पंगा घेऊ नका आणि त्याला चिथाऊ नका. आपली दैनंदिन व्यवसायातील प्रगती होण्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागण्याचा संभव आहे. प्रतिस्पर्ध्यांचा उघड उघड सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

उपाय : देवीच्या देवळात लाल वस्त्र दान करा.

तुळ

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण आलेला पैसा जर योग्य मार्गाने आला असेल, तर जरूर स्वीकारा. अन्यथा त्यातून आपले नुकसानच होईल. सरकारी कामातून फायदा संभवतो. पण या आठवड्यात आपल्याला कोणती तरी मानसिक व्यथा सतावत राहण्याची शक्यता आहे.

उपाय : सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.

वृश्चिक

या आठवड्यात आपल्या हातून काही धार्मिक कृत्ये घडण्याची शक्यता आहे. त्यासाठी कदाचित प्रवासही घडेल. संत सहवास घडेल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या धर्माचरणाच्या प्रभावाने एखादी मंत्र सिद्धी प्राप्त होण्याचा संभव आहे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या, आठवडा छान जाईल.

उपाय : मंगळवारी बजरंगबाण वाचा.

धनु

आपला काही स्वतंत्र उद्योग असेल, तर या आठवड्यात आपल्याला त्यात काहीतरी क्लिक मिळून भरभराट होण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल, तर आपल्या कामावर आपले वरिष्ठ खूश होऊन आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक प्राप्ती पण वाढेल.

उपाय : गुरुवारी दत्ताची आराधना करा.

मकर

या आठवड्यात सभा-समारंभात सहभागी होण्याचे योग दिसत आहेत. आपल्या वडील-भावंडासमवेत अथवा खास मित्रमंडळींसमवेत या समारंभात सहभागी होण्याचा संभव आहे. त्यातून आपल्याला काहीतरी फायदाच संभवतो. उंची वस्तुंची देवाण-घेवाण संभवते. समाजात मानसन्मान मिळेल. प्रतिष्ठा उंचावेल. मस्त जाईल आठवडा.

उपाय : घरात देवासमोर कापूर लावून तो सर्वत्र फिरवा.

कुंभ

खर्च कमी करा. या आठवड्यात या ना त्या कारणाने पैसा बराच खर्च होण्याची शक्यता आहे. पण विचारपूर्वक आणि जिथे जरुरी आहे तिथेच खर्च करा. अन्यथा नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा आणि वाहन चालवताना लागणारी सर्व कागदपत्रे सोबत ठेवा. सांभाळा.

उपाय : रात्री झोपताना हनुमान चालिसा वाचा.

मीन

या आठवड्यात मन थोडे बेचैन, चंचल होण्याचा संभव आहे. उदासीनता, आळशीपणा यायची शक्यता आहे. पण आळशीपणा झटकून टाका. मनाला काहीतरी आमिष दाखवून उभारी द्या आणि मग छान कामाला लागा. कोणत्या तरी कलेमध्ये किंवा काहीतरी नवीन शिकण्यामध्ये स्वत:ला गुंतवा. आठवडा छान जाईल.

उपाय : दशरथकृत शनिस्तोत्र शनिवारी म्हणा.

Advertisement
Tags :

.