खजाना भविष्य
बुधवार, दि. 11 ते मंगळवार, दि. 17 मार्च 2026 पर्यंत
मेष
आपण आतापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाले असे तुम्हाला वाटेल. कारण या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या कष्टाची, आपल्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. आपले वरिष्ठ आपल्या कामावर खूश होऊन आपला सन्मान करतील. आपल्याला पत-प्रतिष्ठा मिळेल. काही रेल्वेचे छोटे-मोठे प्रवासही होण्याचा संभव आहे.
उपाय : पक्ष्यांना चारा पाणी द्या.
वृषभ
आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागण्याची शक्यता आहे. वेळेवर औषधोपचार करावा. या आठवड्यात थोडी चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण थोडा मनावर ताबा ठेवून शांत रहायला हवे. जमिनीचे व्यवहार करण्याच्या विचारात असाल, तर थोडा धीर धरा. गडबड नको. कदाचित गडबड केलीत तरी लवकर होणार नाही.
उपाय : मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.
मिथुन
परीक्षेचे दिवस असल्याने आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कालावधीत मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची, आधाराची गरज असते. विद्यार्थी असाल, तर भरपूर अभ्यास करावा लागण्याचा संभव आहे. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण फुकट मिळालेले धन स्वीकारू नये, त्यामुळे नुकसान होण्याचीच शक्यता असते.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
कर्क
नोकरीच्या शोधार्थ असाल, तर या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. हाताखालील, घरी अथवा बाहेर नोकरवर्गाचे सहकार्य मिळण्याचा संभव आहे. पण कोणत्याही बाबतीत पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून राहू नका. काहीवेळा अतिविश्वासच घात करण्याचा संभव असतो. तब्येतीला सांभाळा.
उपाय : शिवआराधना करा.
सिंह
काहीतरी करण्याची आपण धडपड करीत आहात. कदाचित या आठवड्यात त्याला काहीतरी मार्ग मिळण्याचा संभव आहे. कोणत्याही गोष्टीची घाई गडबड न करता, भूलथापाना बळी न पडता, डोकं शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या. नाहीतर व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वीच नुकसान नको.
उपाय : सूर्योदयाला अर्ध्य द्या.
कन्या
अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण सावधान. ते धन योग्य मार्गाने येत असेल, तरच स्वीकारा. लॉटरीचे तिकीट काढून पहायला काहीच हरकत नाही. कदाचित फायदा होण्याची शक्यता आहे. कोणत्या तरी लक्झरी सामानाची खरेदी करण्याची शक्यता आहे. मनाला कोणती तरी चिंता सतावण्याची शक्यता आहे. पण शांत रहा.
उपाय : गजाननाची आराधना करा.
तूळ
घरातील वडील मंडळींचे सहकार्य व आशीर्वाद मिळतील. आपल्याला काहीतरी धर्मकार्य हातून घडावे, असे या आठवड्यात वाटण्याची शक्यता आहे. काही दानधर्म करावासा वाटल्यास अवश्य करा. पुण्य मिळेल. संतांचा सहवासही मिळेल. त्यांच्याकडून गुरुपदेशही मिळेल. समाधानाची प्राप्ती होईल. वडिलांच्या तब्येतीला जपा.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
वृश्चिक
आपल्या उद्योगात वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च पदप्राप्ती होईल. समाजात मान, प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा संभव आहे. वडिलांच्या सल्ल्याने आपल्या उद्योगात सुधारणा केलीत, तर आपल्याला त्याचा फायदाच होईल. शिवाय आपला मुत्सद्दीपणा यासाठी उपयोगाला येईलच. व्यवसायानिमित्त परदेशगमनाचा विचारही होईल.
उपाय : मंगळवारी बजरंगबाणचा पाठ करा.
धनु
या आठवड्यात आपल्याला गुरुंचा आशीर्वाद लाभेल. समारंभात सहभागी व्हाल. त्यातून तुम्हाला फायदाच होईल. किमती वस्तुंची भेट मिळेल. समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. राजकारणात असाल, तर यश मिळण्याची शक्यता आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे.
उपाय : गुरुवारी दत्तगुरुंचे नामस्मरण करा.
मकर
खर्चावर नियंत्रण ठेवा. कुठेही कुणालाही जामीन, मध्यस्थी करू नका. नाहक अडचणीत येण्याचा संभव आहे. पण कदाचित या आठवड्यात आपल्याला अध्यात्म मार्गाला वळावे, अशी इच्छा होण्याची शक्यता आहे. वाहन मात्र जपून चालवा. कायदेशीर प्रमाणपत्रे आपल्या हाताशी ठेवा.
उपाय : शुक्रवारी संध्याकाळी घरात महालक्ष्मीची पूजा करा.
कुंभ
या आठवड्यात आपले मन काहीवेळा प्रसन्न, तर काहीवेळा उदास, तर काही वेळा चंचल, द्विधामध्ये अडकण्याची शक्यता आहे. त्यातही काहीच कसे कळत नाही म्हणून चिडचिडही होण्याची शक्यता आहे. ही मनाची घालमेल व द्विधा मन:स्थितीवर जरा शांत राहून ताबा मिळवा. भूलथापांना बळी पडू नका.
उपाय : शनिवारी तळलेले पदार्थ भिकाऱ्यांना खाऊ घाला.
मीन
तुमच्या प्रेमळ वागण्या-बोलण्याची कुटुंबावर चांगली छाप पडेल. पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून प्रेम, माया मिळण्याची शक्यता कमी दिसते. देण्याघेण्याच्या व्यवहारात काळजीपूर्वक विचार करून हात घाला. आपल्याकडून एखादे छान लेखन होण्याचा संभव आहे. त्या प्रकारात प्रयत्न करून पहा.
उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.