खजाना भविष्य
बुधवार दि. 4 ते मंगळवार 10 मार्च 2026 पर्यंत
मेष
या आठवड्यात स्वत:कडे लक्ष द्यावे असे वाटू लागण्याचा संभव आहे. थोडेफार आध्यात्मिक मार्गाला लागून स्वत:चा उद्धार करून घ्यावा, असे विचार मनात येण्याची शक्यता आहे. घर किंवा जमीन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. वाहन सौख्यही मिळेल.
उपाय : शनिवारी शनिमंदिरात जाऊन तेल वाहा.
वृषभ
मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागेल. शांतपणे चिडचिड न करता त्यांचे प्रॉब्लेम सोडवा. अचानक धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थी असाल, तर परीक्षेत यश मिळविण्यासाठी कष्ट करावे लागण्याचा संभव आहे. शेवटी कष्टाविण फळ ना मिळते हेच खरे आहे. कुठलीही विद्या सहजतेने मिळत नाही.
उपाय : गुरुची आराधना करा.
मिथुन
नोकरी असो अगर व्यवसाय असो आपल्या हाताखालील सहकारी वर्गाचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधार्थ असाल, तर या आठवड्यात ती मिळण्याची शक्यता आहे. पण आपल्या मौल्यवान वस्तू मात्र सांभाळा आणि स्वत:च्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्या.
उपाय : पक्ष्यांना चारा-पाणी द्या.
कर्क
स्वतंत्र व्यवसाय करत असाल, तर त्यात प्रगती संभवते. आपल्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात आपल्या व्यवसायातून आपल्याला प्राप्ती चांगली मिळेल, असे वाटते. त्यासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता आहे. पण काही प्रतिस्पर्धी उघड शत्रू पण भेटण्याचा संभव आहे.
उपाय : ॐ नम: शिवायचा जप करा.
सिंह
अचानक धनलाभ संभवतो. पण तो स्वीकारताना पूर्ण विचार करून स्वीकारा. कारण काहीवेळा तो पैसा तुम्हाला घातकही ठरू शकतो. काही अंशी आपले नुकसानही करू शकतो. चांगल्या मार्गाने पैसा येत असल्यास स्वीकारा. तब्येतीला सांभाळा. या आठवड्यात आपल्याला कोणतीतरी चिंता सतावण्याचा संभव आहे.
उपाय : मंगळवारी बजरंगबाण वाचा.
कन्या
घरात काही सुखसोयीच्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. काही शुभ कार्याच्या गोष्टी, ज्या बऱ्याच दिवसापासून करू म्हणत राहिल्या होत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यता दिसते. सत्संग संभवतो. तीर्थयात्रा घडण्याची पण शक्यता आहे. पण ती ठरवताना खूप अडचणीसुद्धा येण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
तुळ
आपल्या कामावर आपले वरिष्ठ खूश होऊन आपली पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी आपला मान वाढून आपला सन्मान होण्याचा संभव आहे. यश व ऐश्वर्यप्राप्ती होईल. समाजातील दर्जा वाढेल आणि कदाचित नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमनाचाही विचार केला जाईल.
उपाय : गाईला गूळ-भाकरी, चपाती खाऊ घाला.
वृश्चिक
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम जाईल, असे दिसते. सभा-समारंभात सहभागी होण्याची संधी मिळून त्यातून अनेक लाभ होतील. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होण्याचा संभव आहे. त्यातून पैसा, प्रसिद्धी व किमती वस्तू भेटीदाखल मिळण्याची शक्यता आहे. आपण धाडसाने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल.
उपाय : शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीचे पूजन करा.
धनु
परदेशातून धनलाभ संभवतो. परदेशी मालाची खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असाल, तर त्यातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात असाल, तर मात्र सांभाळून रहा. फसव्या आश्वासनांना बळी पडण्याची शक्यता आहे. शिवाय शत्रूपक्षाकडूनही त्रास संभवतो. वाहन जपून चालवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपाय : गुरुवारी मंदिरात जाऊन दत्त दर्शन घ्या.
मकर
या आठवड्यात कौटुंबिक सुखात काही कमतरता नाही. पण काही वेळा तुमचीच चिडचिड होण्याचा संभव आहे. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण चिडचिड झाली की, मन अस्वस्थ होते आणि मग उदासिनता येते. हे सर्व टाळण्यासाठी शांत राहणे उत्तम. कष्ट करा आणि मान मिळवा, असे हा आठवडा सांगतो.
उपाय : भुकेल्याला अन्न द्या.
कुंभ
वडिलोपार्जित संपत्तीच्या चर्चेमध्येच हा आठवडा जाण्याची शक्यता आहे. प्राप्तीची शक्यता कमी. आपल्या वाणीवर, आपल्या बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या तेवढ्या गोष्टीवर चिडून कठोर शब्द वापरू नका. त्यामुळे होत आलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. काहीतरी लेखन करा. त्यात कदाचित यश मिळेल.
उपाय : अपंगांना मदत करा.
मीन
कष्टाला पर्याय नाही. पण आपण केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून काही लाभ आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपली काही किमती वस्तुंची खरेदी होण्याचा संभव आहे. काहीशा आरामदायी अथवा ऐषारामी वस्तुंचा लाभ घ्याल.
उपाय : शनिवारी तळलेले पदार्थ भिकाऱ्यांना खाऊ घाला.