खजाना भविष्य
4.2.2026 ते 10-2-2026
मेष
या आठवड्यात आपल्याला थोडे अस्वस्थ वाटण्याचा संभव आहे. थोडी फार चिडचिडही होईल. पण घाबरू नका. मनावर ताबा ठेवा. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टांकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावे. पालकांनी आपल्या पाल्याकडे, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
उपाय : मंगळवारी संकटमोचन हनुमान स्तोत्र वाचा.
वृषभ
नोकरीत आपल्या सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मातुल घराण्यात काही चांगली घटना घडण्याचा संभव आहे. त्यापासून मिळालेल्या बातमीने मन प्रसन्न होईल. पण तब्येतीला मात्र सांभाळावे लागेल. वातावरण बदलाचा प्रभाव, किचिंतसा पडण्याचा संभव आहे. त्यामुळे थोडे सांभाळण्याची गरज आहे.
उपाय : गायीला भाकरी, चपाती व गूळ खायला घाला.
मिथुन
आपल्या जोडीदाराच्या सल्ल्याशिवाय काही करून जाल, तर कदाचित फसवले जाण्याचा संभव आहे. कोणत्याही भूलथापाना बळी पडू नका. कोर्ट-कचेरीची जर कामे चालली असतील, तर समजुतीने घेतल्यास फायद्यात राहण्याची शक्यता आहे. स्वतंत्र व्यवसायात असाल, तर या आठवड्यात व्यवसायवृद्धी होण्याची शक्यता आहे.
उपाय : भुकेलेल्याला अन्न द्या.
कर्क
अचानक धनलाभ किंवा नोकरीत अचानक पगारवाढ, असे काही तुम्हाला धक्के मिळण्याची शक्यता आहे. अथवा सहज म्हणून लॉटरी तिकीट काढले आणि खरंच लॉटरी लागली असेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात आपल्याला ऐश्वर्यात आपण लोळतो आहोत, असे वाटेल. पण बोलण्यावर थोडा संयम ठेवा.
उपाय : शुक्रवारी तिन्ही सांजेला महालक्ष्मीची पूजा करा.
सिंह
आध्यात्मिक मार्गाची आवड उत्पन्न होण्याची शक्यता आहे. काही दूरच्या तीर्थयात्रा घडण्याचा व संतांचा सहवास मिळण्याची पण शक्यता आहे. अशा काही अनपेक्षित घटना घडतील की, त्यामुळे थोडेसे संसारातून विरक्ती येण्याचा संभव आहे. काहीवेळा हे चांगलेही असते. पण त्याचवेळी प्रलोभनांना बळी पडू नका.
उपाय : मंगळवारी बजरंगबाणाचा पाठ करा.
कन्या
आपण केलेल्या कामाचे चीज होईल, असे दिसते. पण यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतील. आपण केलेल्या कष्टाचे फळ म्हणून आपल्या उद्योगधंद्याची भरभराट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उचित मानसन्मानही संभवतो. वडिलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील.
उपाय : शनिवारी तळलेले पदार्थ भिकाऱ्यांना खाऊ घाला.
तुळ
जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल, असे हा आठवडा तुम्हाला सांगतो आहे. संधी येतील पण आलेल्या संधीचा योग्य फायदा कसा करून घ्यायचा ते मात्र सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. सभा, समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. नवीन मौल्यवान वस्तू घरात आणण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी महादेवाला बेल वाहा.
वृश्चिक
परदेशातून लाभ संभवतो. पण खर्च सुद्धा खूप होण्याची शक्यता आहे. परदेशी किंवा इथल्या वस्तूंचा आयात-निर्यातीचा व्यापार करत असाल, तर फायदा आणि त्यानुसार खर्च, असे दोन्ही होण्याचा संभव आहे आणि त्या संदर्भात परदेशवारीचीदेखील शक्यता आहे. पण व्यवहार करताना जपून, फसवले जाण्याची पण शक्यता आहे.
उपाय : रोज हनुमान चालिसा वाचा.
धनु
या आठवड्यात मन थोडे अस्वस्थ, चंचल होण्याचा संभव आहे. आपल्या कामात निर्णय घेताना थोडे गेंधळून गेल्यासारखे वाटेल. हे का ते अशी द्विधा मन:स्थिती होण्याचा संभव आहे. पण मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही, शांत रहा.
उपाय : ॐ नम: शिवायचा जप करा.
मकर
या आठवड्यात छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबप्रमुख असाल, तर काही वेळा कुटुंबासाठी, त्यांच्या भल्यासाठी काही निर्णय घेणे गरजेचे असते. पण ते सौम्य शब्दातही सांगता येतात. पैतृक संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.
कुंभ
‘कष्टाविना फळ ना मिळते’ या उक्तीची कायम आठवण ठेवा. पळत्या पाठी धावू नका आणि शॉर्टकट मार्ग अवलंबू नका. कारण कदाचित कष्ट न करता फळ मिळविण्याचा विचार तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. कदाचित कोणीतरी चुकीचा सल्ला देण्याचा संभव आहे. अशाला बळी पडू नका. सारासार विचार करा.
उपाय : शंकराची उपासना करा.
मीन
आपण विद्यार्थी दशेत असाल, तर आपल्याला अभ्यास खूप आणि प्रामाणिकपणे करावा लागेल. तरच यश मिळेल. मातेच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहन, जमीन वगैरे खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर जरूर करा. पण ते तुमच्या नावावर होईतोवर थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.
उपाय : रोज शनिस्तोत्र वाचा.