For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:01 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 14 ते मंगळवार दि. 20 जानेवारी 2026 पर्यंत

Advertisement

मेष

अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट काढून परीक्षा करण्यास काहीच हरकत नाही. गूढ विद्या शिकत असल्यास किंवा शिकण्याची इच्छा असल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कामाची सगळीकडे प्रशंसा होईल. त्यामुळे आपला मान, आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कदाचित त्यातूनही धनलाभ संभवतो.

Advertisement

उपाय : मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्या.

वृषभ

नोकरीच्या प्रयत्नात असाल, तर या आठवड्यात आपल्याला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित परदेशातील नोकरीशी संलग्न असेल किंवा परदेशातून फायदा मिळण्याचा संभव आहे. आपल्या हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. गुप्त शत्रूपासून मात्र सावध रहा. मौल्यवान वस्तू सांभाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.

मिथुन

जोडीदाराशी वितंडवाद घालू नका. त्याचा सल्ला विचारात घ्या. त्यातून आपल्याला फायदाच होईल. तुमचा जर छोटासाच व्यवसाय असेल, तर जोडीदाराचा सल्ला त्यासाठी खूपच उपयोगाचा ठरेल. व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यावर सहज मात करू शकाल. मात्र या आठवड्यात तब्येतीला सांभाळा. विशेषत: कंबरेची काळजी घ्या.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

कर्क

सासुरवाडीकडून काहीतरी फायदा संभवतो अथवा लॉटरीसारख्या साधनातून लाभ संभवतो. पण हे मिळवताना अथवा मिळताना तो लाभ योग्य मार्गानेच मिळतो आहे ना याची खातरजमा करून घ्या. नको त्या वादविवादात शक्यतो पडू नका. आईच्या व जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

सिंह

आपल्या हातून काही धार्मिक कार्य घडण्याचा संभव आहे आणि हे धर्मकार्य आपल्याला नक्कीच फायदा करून देण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सहवास, त्यांचा आशीर्वाद मिळून जाईल. कदाचित या निमित्ताने संतदर्शन वा संतांचा सहवासही लाभेल. या आठवड्यात आपल्याला आत्मिक समाधान मिळेल.

उपाय : मंगळवारी संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणा.

कन्या

ही संक्रांत आपल्याला छानच जाणार असे दिसते. आपल्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. स्वतंत्र व्यवसायात असाल, तर उद्योगाची भरभराट होण्याची शक्यता आहे. नावलौकिक संभवतो. वडिलांचा सल्ला उपयोगी पडेल. परदेशी जाण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.

उपाय : महालक्ष्मीची उपासना करा.

तुळ

आपल्या कामाचे कौतुक होऊन समाजात श्रेष्ठत्व प्राप्त होईल. उंची वस्तुंची देवाण-घेवाण होण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न कराल आणि कदाचित तुम्हाला त्यातून फायदाच होण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा आपल्याला उत्तम जाईल.

उपाय : दत्तगुरुंची उपासना करा.

वृश्चिक

खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. तब्येतीला सांभाळा. विशेषत: डोळ्यांना सांभाळा. वाहन चालवताना रहदारीचे नियम पाळा. कोर्टात काही केस चालू असेल, तर तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमच्या मनासारखा निकाल लागण्याची शक्यता फार कमी आहे.

उपाय : हनुमानाची उपासना करा.

धनु

मन थोडे अस्थिर व उदास होण्याची शक्यता आहे. मनाला शांत करा. रागावर नियंत्रण ठेवा. समोरच्या माणसाचे मन दुखवू नका. मुलांच्या प्रगतीची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे. त्यांचे लांबचे प्रवासही होतील. मुलांच्या प्रगतीकडे पाहून मन प्रसन्न ठेवा. आनंदी रहा.

उपाय : भटक्या कुत्र्यांना खायला द्या.

मकर

ही संक्रांत कुटुंबासमवेत झकास जाईल. आपल्या वागण्या-बोलण्याने कुटुंबाला आनंद द्याल. आपल्या वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात काही चर्चा चालू होण्याची शक्यता आहे. पण घाई करू नका. आपल्या हातून काहीतरी लिखाण होण्याची शक्यता आहे. लिखाण करा, यश मिळेल.

उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.

कुंभ

कष्ट करण्यास आळस करू नका. कष्टाविना फळ मिळेल, अशी आशा करू नका. कष्ट कराल, तर आपले भाग्य नक्की आपली साथ देईल. अन्यथा तुम्ही स्वत:च आपले नुकसान करून घेण्याची शक्यता आहे. छोट्या भावंडांचा, मित्रांचा सहवास मिळून त्यांच्याबरोबर छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

उपाय : काळे उडीद व काळे तिळ शनिवारी शनिला वाहा.

मीन

वाहन अथवा घर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर घाई करू नका. किंबहुना या आठवड्यात हे काम होण्याची शक्यता कमी आहे. आईच्या व वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्जनाच्या कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. थोडे आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याची पण शक्यता आहे.

उपाय : मंगळवारी मारुतीला लाल वस्त्र व लाल फूल अर्पण करा.

Advertisement
Tags :

.