खाजन शेती बुडाली, आता गावे वाचवा
मुस्लिम, पोर्तुगीज आक्रमकांनी गोव्यात प्रचंड धर्मछळ केला, पण येथील कृषीसंस्कृतीला धक्का लावला नाही. गोवा मुक्तीनंतरही भाऊसाहेब बांदोडकर यांनी खाजनशेतीचा विस्तार केला, मात्र नंतरच्या काळात अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी ही सोन्याची खाण लुटण्याची एकही संधी सोडली नाही, म्हणून आज खाजन शेती शरपंजरी पडलेली आहे.
गोव्यात पोर्तुगीज राजवटीपूर्वी अनेक शतके, तसेच पोर्तुगीजांच्या गोव्यातील साडेचारशे वर्षांच्या राजवटीत आणि गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त झाल्यानंतरच्या सुरूवातीच्या वीस-पंचवीस वर्षांपर्यंत गोवा कृषीसंपन्न होता, सुजलाम सुफलाम होता! कदंब राजवटीच्या काळात खाजन शेतजमीन तयार करण्यास प्रारंभ झाला होता. मात्र आज तीच शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गोव्यातील मौर्य, अभिर, भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार आणि कदंब राजवटीपर्यंत गोवा कृषीसंपन्न होता. स्वत:ला आवश्यक तेवढ्या पिकाचा वापर कऊन राहिलेले उत्पादन विकून राज्याच्या गंगाजळीत मोठी भर पडायची. अखंड भारत वर्षाच्या अनेक प्रांतामध्ये नारळ, फणस, आंबे, तांदूळ, नाचणी, कंदमुळे गोव्यातून जायची. मुस्लिम आक्रमकांनी आणि साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत त्यांनी मोठ्याप्रमाणात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतरण केले. हजारो देवस्थाने उद्ध्वस्त करून ‘इगर्जी’ म्हणजे चर्चेस उभारल्या. मात्र त्यांनी गोव्यातील शतकानुशतकांच्या कृषीसंस्कृतीचे नुकसान केले नाही. गोव्यातील शेती म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पिकविणारी खाण’ होती. प्राचीन खाजन शेतजमिनीचे संरक्षण केले. नवीन बांध घालून नवी खाजन जमीन विकसित केली. हे सर्व नमूद करण्याचे कारण म्हणजे पोर्तुगीजांचे गोडवे गायचे नाही, तर धर्मांध असूनही त्यांनी गोव्याची शेती, फळबागायत जपली, याकडे लक्ष वेधायचे आहे.
कुमेरी, पुरण, मरड, वायंगण, खाजन या गोव्यातील प्राचीन शेती पद्धती आहेत. यातील खाजन ही सर्वांत मोठी तसेच सर्वाधिक पीक देणारी होती. अगदी 1985 - 1990 पर्यंत गोव्याची कृषीसमृद्धी तिच्यावरच भक्कमपणे उभी होती. मोठमोठी एकत्र कुटुंबे तिच्यावर पोसली जायची. गावांची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून होती. मात्र सध्या खाजन शेतजमीन बुडाली आहेच, पण गेल्या काही वर्षात पडणारा पाऊस पाहता आणि यापुढे अशाच रौद्रऊपी पावसाचे अनुमान गृहीत धरता येत्या चार-पाच वर्षांत या शेतजमिनीच्या बाजूला असलेले अनेक गावांतील अनेक वाडे बुडण्याची शक्यता आहे. मांडवी, जुवारी, शापोरा आणि अन्य नद्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या या खाजनशेतीसाठी अत्यावश्यक असलेले नद्यांच्या बाजूकडचे बांध कोसळून पडल्यास नदीचे पाणी सध्या भरून असलेल्या शेतजमिनीतून गावात येईल. परिणामी सखल भागातील गाव बुडून जाईल. कोण रोखू शकणार या नैसर्गिक प्रक्रियेला? तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली, मुरगाव, सासष्टीत मोठ्याप्रमाणात खाजन आहे. ‘खाणी’ करुन, बांध मोडून मासळी पिकविण्याच्या धंद्याला ऊत आलेला आहे. सरकारे येतात आणि जातात पण खाजनातील भ्रष्टाचार कोणी रोखू शकले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता या खाजनशेतीकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.
वर्षातून एकदाच पीक देणारी, पण भरभरून देणारी ही शेती. वर्षभर घरातील सर्वांचे उदरभरण कऊन राहिलेले पीक विकून आलेल्या पैशांतून घरात समृद्धी नांदायची. शिवाय मासळीही मिळायची, फॉर्मेलीनयुक्त मासळी खावी लागत नसे. काही खाजनात मीठ उत्पादन कऊन त्याच्या विक्रीतूनही हाती पैसा यायचा. गोव्याची खरी सोन्याची खाण होती ती खाजनशेतीच! पण ती आता नष्ट झालेली आहे. तिला पुनरुज्जिवीत करायची झाल्यास भगिरथाचीच गरज आहे. राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. लोकशक्तीचा पाठिंबा हवाय.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील जवळपास प्रत्येक विधानसभा अधिवेशनात न चुकता खाजनशेतीविषयी चर्चा होते. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही खाजनावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की खाजन शेतीचे संवर्धन व्हायला हवेच, जे बांध मोडून पडले आहेत, ते दुऊस्त करण्यात येतील. सरकारने कोट्यावधी ऊपये खर्चून बांध उभारले आहेत. पण आपल्या माहितीप्रमाणे तेथे कोणी शेती करतच नाही, अशी आमोणे येथील वस्तुस्थिती आहे. तरीही ही शेती वाचविण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या पूर्ण दशकभराच्या राजवटीत सर्वाधिक प्राधान्य खाजन शेतीसह अन्य विविध प्रकारची शेती, कुळागरे, बागायतींना दिले. जे खाजन जमीन कसत होते ती जमीन त्यांच्या नावावर केली. नवीन गडगंज बांध बांधून खाजनांचा विस्तार केला. खाजनाला पोषक आणि ‘खंडीच्या खंडी’ पीक देणारी ‘आसगो’ व ‘कोंरगुट’ बियाणी मोफत दिली. मानशीचा लिलाव फक्त शेतकऱ्यासाठीच ठेवला. एकंदरीत मगो पक्षाच्या राजवटीत गोवा कृषीसंपन्न, आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण होता, खाजन सोन्याची खाण होती, असे मत नोंदविले तर आज अनेकांना वाईट वाटू शकते. आज तांदूळ, नारळ, भाजी, फळे, फुले यासह सर्वच गोष्टींसाठी अन्य राज्यांवर निर्भर रहावे लागते. कृषीसंपन्न गोव्याची आज ही बिकट अवस्था का झाली? मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खाजनशेतीसाठी काहीतरी करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला आहे. कृषी, जलस्रोत व महसूल अशा तीन खात्यांच्या झंजाळात खाजनशेती अडकली आहे. एखादी समस्या निवारणासाठी जेव्हा एकच खाते जबाबदार असते तेव्हा तिथेच जर तुघलकी कारभार सुरु असेल तर खाजनांच्या बाबतीत या तीन खात्यांचा काय कारभार सुरु आहे, याची पूरेपूर जाणीव खाजन शेतकऱ्यांना होतीच, मात्र आता ती मुख्यमंत्र्यांनाही झाली आहे. तीन खात्यांच्या कात्रीतून खाजनाला बाहेर काढण्यासाठी, त्याच्या प्रशासकीय कामात थोडीतरी सुसुत्रता येऊ शकेल, यासाठी गोवा खाजन जमीन संवर्धन महामंडळ स्थापून त्याच्यामार्फत या शेतीला पुर्नवैभव देण्याचा प्रयत्न करता येईल. काही वर्षांपूर्वी भाजपचे आमदार स्व. विष्णु सूर्या वाघ, राजू भिकारो नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी महामंडळ स्थापन करण्याचा विचार केला होता. त्यानंतर त्यांना सविस्तर अहवालही सादर करण्यात आला होता. मात्र दोघांच्या मृत्यूमुळे त्या अहवालाचे काय झाले, हे कळण्यास मार्ग नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पुन्हा खाजनशेतीविषयी आस्था व्यक्त करुन खाजन संवर्धन मंडळ स्थापन करण्याची केलेली घोषणा नक्कीच स्वागतार्ह आहे.
राजू भिकारो नाईक