For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजी ते पीजी शिक्षण विनामूल्य देणार

06:25 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
केजी ते पीजी शिक्षण विनामूल्य देणार
Advertisement

दिल्लीत भाजपचा दुसरे वचनपत्र, आपशी स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीची विधानसभा निवडणूक जवळ येत असून प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांवर भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून आश्वासनांचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पक्षाने मंगळवारी या निवडणुकीसाठी आपले दुसरे वचनपत्र सादर केले आहे. दिल्लीत केजी ते पीजी शिक्षण गरजवंत विद्यार्थ्यांना विनामूल्य दिले जाईल, असे आश्वासन या दुसऱ्या वचनपत्रात देण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

Advertisement

तसेच, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची साहाय्यताही दिली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे हे दुसरे वचनपत्र मुख्यत: शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसून येते. व्यावसायीक आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 1 हजार रुपयांचे साहाय्यता धन देण्याचे आश्वासनही या पक्षाने दिले आहे.

रिक्षा चालकांसाठी मोठी आश्वासने

भारतीय जनता पक्षाने आपल्या दुसऱ्या वचनपत्रात दिल्लीतील रिक्षा चालकांसाठीही आकर्षक आश्वासने दिली आहेत. रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रिक्षाचालकाला 10 लाखाचा आयुर्विमा आणि 5 लाखाचा अपघात विमा दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

घरगुती कर्मचाऱ्यांसाठी योजना

भारतीय जनता पक्षाने घरगुती कर्मचाऱ्यांसाठीही अनेक कल्याणकारी योजना घोषित केल्या आहेत. त्यांच्यासाठीही रिक्षा चालकांप्रमाणे 10 लाखांचा आयुर्विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघात विमा देण्यात आला आहे. त्यांच्याही मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्तेवर आल्यास आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात घडलेल्या आर्थिक गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याचेही आश्वासन या पक्षाच्या वचनपत्रात आहे. आम आदमी पक्षानेही अशाच प्रकारची आश्वासने दिली आहेत. एकंदर, दोन्ही पक्षांमध्ये सध्या आश्वासनांची स्पर्धा होत असल्याचे चित्र आहे. आता मतदार नेमके काय करणार, हे मतगणनेनंतरच उघड होणार आहे.

5 फेब्रुवारीला मतदान

दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या राज्यात विधानसभेच्या 70 जागा असून सलग तीनवेळा आम आदमी पक्षाची सत्ता या राज्यात आहे. या पक्षाचे पहिले सरकार अल्पजीवी ठरले होते. तथापि, नंतर 2015 आणि 2020 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाने घवघवीत यश प्राप्त केले होते. आगामी निवडणुकीत या पक्षाची स्पर्धा मुख्यत्वेकरुन भारतीय जनता पक्षाशी आहे. काँग्रेस सध्यातरी तिसऱ्या स्थानावर असून या पक्षाचा प्रभाव गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये नगण्य ठरला होता. यावेळीही तशीच परिस्थिती असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र, दिल्लीतील काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, असे मानण्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष गेली 27 वर्षे दिल्ली राज्याच्या सत्तेपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे हा पक्षही यावेळी प्रचंड प्रयत्न करताना दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.