केजी टू पीजीचे शिक्षण मोफत मिळावे
आयएफेटो शिक्षक संघटनेच्या अधिवेशनात ठराव मंजूर
कोल्हापूर
के. जी. ते पी. जी. पर्यंतचे शिक्षण सरकारी खर्चातून मोफत आणि सक्तीचे करावे, असा ठराव आयएफेटोच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. कोल्हापूर येथे देशभरातील विविध राज्यातून आलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनामध्ये विविध ठराव केले. अधिवेशनाची सांगता करण्यात आली.
शिक्षकांना सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. केंद्र सरकारने जीडीपीच्या दहा टक्के खर्च केला पाहिजे. सर्व राज्यांनी आपल्या बजेटच्या किमान 30 टक्के खर्च शिक्षणावर करावा. देशभरातील शिक्षकांसाठी अभ्यासक्रम वेतन यासाठी समान धोरण असावे. सर्व स्तरावरील शिक्षणामध्ये होत असलेले खाजगीकरण थांबविण्यात यावे, असे विविध ठराव केले. खुले अधिवेशनाचे उद्घाटक आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम दिले पाहिजे. अशैक्षणिक कामाने शिक्षक वैतागलेला आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची गाठभेट होईनाशी झाली आहे. सर्व सरकारी शाळा यामुळे हळूहळू बंद पडतील हे होऊ नये, यासाठी सरकारने शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे काम देऊ नये. राज्यात शिक्षकांबरोबरच देशभरातील शिक्षकांच्या आंदोलनामध्ये वेगळ्या सक्रिय उपक्रमामध्ये भाग घेऊन शिक्षकाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी शिक्षणाचं मनुस्मृतिकरण होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. संविधानामुळे सर्व वर्गातील मुले आणि महिल शिकू लागले आहेत हे काही जणांना पाहवत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व वर्गाचे शिक्षण संपवण्याची चाल सध्या सुरू आहे. यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहून याला प्रखर विरोध केला पाहिजे. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, भरत रसाळे, अनिल लवेकर, दिलीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी शिक्षणावर, शिक्षकांच्या समस्येवर आपले विचार मांडले. या अधिवेशनात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओरिसा, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, आदी राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रमोद तौंदकर यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब किर्तीकर व उमर जमादार यांनी केले. आभार शहराध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.