गणाचारी गल्लीतील सार्वजनिक नळाला बसविली चावी
नगरसेवक शंकर पाटील यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान
बेळगाव : गणाचारी गल्ली येथील सार्वजनिक नळाची चावी मोडल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र नळाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरसेवक शंकर पाटील यांनी पुढाकार घेत चावी बसविली आहे. त्यामुळे वाया जाणारे पाणी थांबण्यास मदत झाली आहे. नागरिकांनीदेखील पाण्याची नासाडी होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. शहर व उपनगरात असलेले सार्वजनिक नळ सध्या बंद असले तरी काही ठिकाणच्या नळांना अद्यापही पाणी सोडले जाते. घरगुती नळांना आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात असल्याने बहुतांश जण सार्वजनिक नळांचा उपयोग करतात. गणाचारी गल्ली येथे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक नळ आहे. मात्र त्या नळाला चावी नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. हा प्रकार नगरसेवक शंकर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सदर नळाला चावी बसविली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.