केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला गती
कोल्हापूर :
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील कामे युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. ऑक्टोंबर अखेरपर्यंत पावसाळा लांबल्यामुळे कामे सुरू करता आली नव्हती. आता मात्र कामे गतीने सुरू झाली असून सहा महिन्यांत सिव्हील वर्कची सर्व कामे पूर्ण करण्याचे टार्गेट संबंधित ठेकेदाराला दिले आहे.
केशवराव भोसले नाट्यागृह आगीत भस्मसात झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीसाठी महायुती सरकारने तत्काळ 25 कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी 7 कोटी 31 लाखांचा पहिल्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेकडे निधी वर्गही झाला. परंतू ऑक्टेंबर अखेर पावसाचा जोर कायम असल्याने कामाला सुरवात करता आली नव्हती. दरम्यान, जळलेले साहित्य काढण्याचे काम करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने छतासह नाट्यागृहातील बैठक व्यवस्था येथील जळालेले साहित्य नाट्यागृहाच्या परिसरात काढून ठेवले आहे. पाऊस थांबल्यानंतर या महिन्यामध्ये ठेकेदाराने प्रत्यक्ष नाट्यागृहातील कामांना सुरुवात केली आहे. नाट्याप्रेम, कलाकारांकडून वर्षामध्ये नाट्यागृहाच्या पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाकडून काम लवकर पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. संबंधित ठेकेदाराला सहा महिन्यांत सिव्हील वर्क पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून मनुष्यबळ वाढविले असून युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे.
जळलेल्या भिंतीचा गिलावा काढला आहे. तसेच आगीमुळे खराब झालेले भिंतीच्या छताजवळील दीड मीटरपर्यंत दगडही काढले आहेत. आता नवीन गिलावा आणि दगड लावून स्ट्रक्चरल तयार करण्याचे काम हाती घेणार आहे. त्यानंतर मंजूर केलेल्या आराखड्यानुसार छत आणि नाट्यागृहातील कामे होणार आहेत. जुन्या इमारतीस आग लागलेल्यानंतर नाट्यागृहाच्या बाजूला काढून ठेवलेल्या साहित्यापैकी सुस्थितीमध्ये असणाऱ्या लाकडांचा केवळ वापर सध्या होईल, अशी स्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कामांना सुरवात होईल. ही कामे झाल्यानंतर नाट्यागृह खुले करण्यास अडचण येणार नाही. चौथ्या टप्प्यात पार्कींगसह अन्य कामे नाट्यागृह सुरू झाले तरी करणे शक्य आहे. पुढील वर्षाच्या आत ही सर्व कामे होतील अशी अपेक्षा आहे.
22 कर्मचाऱ्यांची नेमणूक
सिव्हील वर्क सहा महिन्यांत पूर्ण होण्यासाठी ठेकेदारांने 22 कर्मचारी येथे नियुक्त केले आहेत. जादा वेळ त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. याचबरोबर कामावर देखरेखीसाठी प्रोजेक्ट इनचार्ज, सिव्हील इंजिनिअर आणि सुपरवायझरची नियुक्ती केली आहे.
केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सध्या 22 कर्मचारी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत काम करत आहेत. सहा महिन्यांत सिव्हील वर्क पूर्ण करण्याचे आसल्याने सोमवार (दि. 2) पासून सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास काम केले जाणार आहे.
गोरखनाथ कटरे, प्रकल्प इनचार्ज, केशवराव भोसले नाट्यागृह पूनर्बांधणी
पहिल्या टप्प्यात होणारे काम - जळून खाक झालेल्या रुपकामाच्या ठिकाणी नवे रुपकाम करणे.
दुसऱ्या टप्प्यातील काम - आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझाईनची काम
तिसऱ्या टप्यातील काम - स्टेज आणि लाईटिंग व्यवस्था करणे.
चौथ्या टप्यातील काम - पार्किंगसह पायाभूत सुविधा निर्माण करणे.