Keshavrao Bhosale Natyagruha: अग्नितांडवातून पुन्हा उभारतेय संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह
अग्नितांडवामुळे करवीरनगरीसह दिग्गज कलाकारही हळहळले
By : धीरज बरगे
कोल्हापूर : दिवस 8 ऑगस्ट 2024 चा. रात्रीचे नऊ, सव्वानऊ वाजलेले. शहरात शांतता पसरत असताना संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला आग लागल्याची बातमी पसरली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक, कला क्षेत्राचा ऐतिहासिक वारसदार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
अग्नितांडवामुळे करवीरनगरीसह दिग्गज कलाकारही हळहळले. सांस्कृतिक, कला क्षेत्रासाठी हा काळा दिवस ठरला. या घटनेला शुक्रवारी वर्षपूर्ती होत आहे. वर्षभरापूर्वी जळून खाक झालेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह आज पुन्हा त्याच दिमाखात उभे राहत आहे. नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पुढील सहा महिन्यात येथे पुन्हा नाटकांची घंटा वाजायला सुरुवात होणार आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 मध्ये विदेश दौरा केला होता. या विदेश दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी असणारी भव्य नाट्यागृहे महाराजांनी पाहिली. अशाच पद्धतीचे नाट्यागृह आपल्या राज्यातही असलं पाहिजे आणि या नाट्यागृहांमध्ये आपल्या मातीतील कलाकारांनी त्यांची नाटके सादर केली पाहिजेत.
इथल्या लोकांना ती पाहता आली पाहिजेत. म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात खासबाग म्हणून ओळखल्या जाणारे ठिकाणी एका भव्य नाट्यागृहाची उभारणी केली. हे नाट्यागृह 1915 मध्येच बांधून पूर्ण झाले आणि या नाट्यागृहाला महाराजांनी नाव दिलं ‘पॅलेस थिएटर’. पुढे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यानंतर या नाट्यागृहाचे नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह यांच्या नावाने झाले.
भारतामध्ये अशी खूप कमी नाट्यागृहे आहेत, की ज्यांना शतकाचा वारसा आहे. त्यातील एक असलेले कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह गतवर्षी याच दिवशी जळून खाक झाले. गतवर्षी 9 ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती साजरी करण्यासाठी पुर्वसंध्येला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहात जयंतीची तयारी कलाकारांनी पूर्ण केली.
तयारी पूर्ण झाल्यानंतर कलाकारही तेथून निघून गेले. अन् रात्री साधारणत: सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास नाट्यागृहातून स्फोटाचा आवाज झाला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी नाट्यागृहाकडे धाव घेतली अन् पाहिले असता नाट्यागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या व्यासपीठाजवळ आग लागलेली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.
अग्निशमन दलाचा बंब तत्काळ त्या ठिकाणी पोहोचला, पण नाट्यागृहाच्या मागील बाजूस जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले अन् संपूर्ण नाट्यागृह आगीच्या विळख्यात सापडले.
भस्मसात झालेले नाट्यागृह पाहून समस्त कोल्हापूरकरांसह कलाकार, रंगकर्मींना अश्रू अनावर झाले. कलाकारांच्या तीव्र भावना पाहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ नाट्यागृहाला भेट देऊन पाहणी केली आणि नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. या निधीमधून नाट्यागृहाचे चार टप्प्यात काम पूर्ण केले जाणार आहे.
यामधील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरु होणार आहे. सहा महिन्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह कलाकार, रसिकप्रेमींसाठी खुले होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागली का लावली गेली?
नाट्यागृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, मात्र नाट्यागृहाला आग शॉर्टसर्कीटमुळे लागली का लावली गेली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर आग लागली का लावली, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने येथील 28 नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे आग लागली का लावली गेली, हे गुलदस्त्यातच राहिले आहे.
तीन तास सुरू होते अग्नितांडव
नाट्यागृहामध्ये अग्नितांडव सुरु होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील असे सुमारे 20 हून अधिक अग्निशमन बंब नाट्यागृहाच्या ठिकाणी दाखल झाले. सुमारे तीन तास सुरु असलेल्या अग्नितांडवामध्ये नाट्यागृह बेचिराख झाले अन् केवळ सांगाडा शिल्लक राहिला. अवघ्या तीन तासात नाट्यागृह आगीत खाक झाले.
मनपा प्रशासनाची तत्परता
कलाकार, रंगकर्मींच्या भावना लक्षात घेता महापालिका प्रशासनानेही नाट्यागृह उभारणीच्या कामात तत्परता दाखवली. निधीची उपलब्धता झाल्यानंतर वर्षभरात नाट्यागृहाची जलदगतीने उभारणी केली. वर्षांच्या आत नाट्यागृह पुन्हा त्याच दिमाखात उभे करण्याचे टार्गेट होते. मात्र ते शक्य झाले नसले तरी पुढील सहा महिन्यात नाट्यागृहाचे काम पूर्ण झालेले दिसेल.