मुंबई इंडियन्स संघात केशव महाराज
वृत्तसंस्था, मुंबई
सध्या सुरू असलेल्या 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील न्यूझीलंडचा अष्टपैलु मिचेल सँटेनर दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज बरोबर मुंबई इंडियन्सने नवा करार केला आहे.
सँटेनरला खांद्याला दुखापत झाली असून सदर दुखापत बरी होण्यासाठी त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. मुंबई इंडियन्सच्या या स्पर्धेतील गेल्या सामन्यात खेळताना सँटेनरच्या डाव्या खांद्याचा स्नायु दुखावला होता. द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने टी-20 प्रकारातील गेल्या 30 सामन्यात 31 गडी बाद केले आहेत.त्याने या क्रीडा प्रकारात आतापर्यंत 218 टी-20 सामन्यांत 27.63 धावांच्या सरासरीने 191 गडी बाद केले आहेत. न्यूझीलंडच्या सँटेनरने 2026 च्या आयपीएल स्पर्धेत 4 सामन्यांत 5 गडी बाद केले आहेत. आयपीएलच्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सचा संघ सध्या 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील पुढील सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर बुधवारी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.