ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या 5व्या गोवा राज्य परिषदेत नवीन समितीची निवड; ॲड. जतीन नाईक यांची अध्यक्षपदी निवड
पणजी : ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU) ची 5वी गोवा राज्य परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. परिषदेत संघटनेच्या मागील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच पुढील कार्यकाळासाठी नवीन राज्य समितीची एकमताने निवड करण्यात आली.
परिषदेला गोव्यातील विविध भागांतून वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. न्यायव्यवस्थेसमोरील आव्हाने, वकिलांच्या विविध समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेची भूमिका यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
नवीन राज्य समितीच्या अध्यक्षपदी ॲड. जतीन नाईक, तर सचिवपदी ॲड. लिओना बॅरेटो यांची निवड करण्यात आली. ॲड. सेलेरिना डी'सा यांची खजिनदारपदी निवड झाली.
नवनिर्वाचित समितीत ॲड. प्रसाद शहापूरकर (उपाध्यक्ष, उत्तर गोवा), ॲड. सेउला ए. वास (उपाध्यक्ष, दक्षिण गोवा व कुशावती), ॲड. विलास परब (सहसचिव), ॲड. हर्षा नाईक (सदस्य व महिला उपसमिती संयोजक), तसेच ॲड. अविनाश भोसले, ॲड. व्हिक्टर सॅव्हिओ ब्रागांका आणि ॲड. प्रसेनजीत ढगे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
नवीन समितीच्या माध्यमातून वकिलांच्या प्रश्नांसाठी तसेच न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या विषयांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.