For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

केर्लेच्या दगडी शिल्पकलेचा ठसा सातासमुद्रापार! 40 कारखाने, 500 कारागिरांना रोजगार; 80 कोटींची वार्षिक उलाढाल

01:12 PM Nov 05, 2026 IST | ABHIJEET RANJANE
केर्लेच्या दगडी शिल्पकलेचा ठसा सातासमुद्रापार  40 कारखाने  500 कारागिरांना रोजगार  80 कोटींची वार्षिक उलाढाल
Advertisement
कोल्हापूर : एका कारखान्यातून सुरू झालेली केर्ले (ता. करवीर) येथील दगडी शिल्पकला आज सातासमुद्रापार पोहोचली आहे. तब्बल 40 कारखाने, 400 ते 500 कारागिरांना रोजगार आणि वर्षाकाठी सुमारे 80 कोटी रुपयांची उलाढाल असा या उद्योगाचा विस्तार झाला आहे. छिन्नी-हातोड्याच्या घावांतून दगडाला देवत्व देणाऱ्या केर्लेच्या कारागिरांनी आपल्या कलेचा ठसा मॉरिशसपासून लंडनपर्यंत उमटवला आहे.

केर्ले येथील दगडी शिल्पकलेचा इतिहास साधारण 1955 ते 1965 या काळात सुरू झाला. शहाबुद्दीन मुल्लाणी यांनी गावात पहिला दगडी कारखाना सुरू केला. छायाचित्रांच्या आधारे दगडातून मूर्ती साकारण्याचा प्रयोग त्यांनी केला. त्यातूनच या कलेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेकांनी शिल्पकलेचे धडे गिरवले आणि पुढे स्वतःचे कारखाने सुरू केले. एका व्यक्तीने लावलेल्या या कलेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

Advertisement

केर्लेतील कारखान्यांमध्ये पाऊल टाकताच छिन्नी-हातोड्यांचा ठेका कानावर पडतो. काळ्याभोर पाषाणाचे मोठमोठे तुकडे यंत्रांच्या साहाय्याने कापून त्यांना प्राथमिक आकार दिला जातो. त्यानंतर कारागिरांच्या हातातील छिन्नी-हातोडे आपले काम सुरू करतात. निराकार दगडातून हळूहळू चेहरा, डोळे, नाक, हात आणि वस्त्रांची नक्षी आकार घेऊ लागते. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर दगडात जिवंत भाव उतरतात.

विठ्ठल-रुक्मिणी, गणपती, हनुमान, शंकर, कृष्ण, बाळूमामा, नागदेवता अशा विविध देवदेवतांच्या मूर्ती येथे घडवल्या जातात. त्याचबरोबर तुळशी वृंदावने, दीपमाळा, मंदिरांचे खांब, प्रवेशद्वारे, चौकटी, स्मारके आणि महापुरुषांचे अर्धपुतळे व पूर्णाकृती पुतळेही तयार होतात. ग्राहकांच्या छायाचित्रांनुसार आणि आराखड्यांनुसार विविध आकारांच्या कलाकृती साकारल्या जातात.

Advertisement

कष्टांतून साकारते कलाकृती

दगडावर घाव घालताना कारागिरांच्या हातांना जखमा होतात, अंगावर धुळीचे थर साचतात; मात्र त्याच कष्टांतून जेव्हा एखादी मूर्ती साकारते, तेव्हा त्यांच्या श्रमांचे सार्थक होते. लोक त्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात, तेव्हा पडद्यामागे राहिलेल्या कारागिरांच्या कष्टांनाही जणू वंदन केले जाते.

पूर्वी मोठ्या दगडाला अपेक्षित आकार देण्यासाठी अनेक दिवस लागत असत. आधुनिक यंत्रांमुळे दगड कापण्याचे काम जलद झाले आहे. मात्र, त्या दगडाला कलात्मक रूप देण्याचे काम आजही कारागिरांच्या हातांनीच होते. त्यांच्या कौशल्य, अनुभव आणि कल्पकतेतून प्रत्येक मूर्तीला वेगळे व्यक्तिमत्त्व प्राप्त होते.

परदेशातही केर्लेच्या कलेचा गौरव

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून केर्लेतील कारखान्यांना कामे मिळू लागली. आता या कलेचा लौकिक देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचला आहे. येथील कारागिरांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे मॉरिशसपर्यंत पोहोचले आहेत. तसेच इसाक मुल्लाणी यांच्या कलाकुसरीतून साकारलेली शिवमूर्ती लंडनमध्ये प्रतिष्ठापित झाली आहे. केर्लेच्या शिल्पकलेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली असून, पारंपरिक कलेच्या माध्यमातून गावाने आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील केर्लेसारख्याच इतर आगळ्यावेगळ्या गावांच्या यशोगाथा वाचण्यासाठी तरुण भारत संवादच्या दिवाळी अंकासह तरुण भारत डिजिटलवर या गावांचे सविस्तर व्हिडिओ पाहता येणार आहेत.

दिवाळी अंक खरेदीसाठी संपर्क : 9975401009

Advertisement
Tags :

.