केरळच्या साहिलचे गोमेकॉत अवयव दान
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : मोपा विमानतळावर कार्यरत होता साहिल,‘गोंय नवें जिवींत’ मोहिमेला चांगले यश
पणजी : केरळच्या एका कुटुंबाने आपल्या 22 वर्षीय मुलाचे अवयव गोवा वैद्यकीय इस्पितळात (गोमेकॉ) दान करण्याचा निर्णय घेऊन सेवाभावी कार्याचे दर्शन घडवले आहे. 22 वर्षांच्या साहिलचे निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा घेतलेला निर्णय अनेक जीवांना प्रकाशाचा किरण देणारा ठरणार आहे. आरोग्य खात्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘गोंय नवे जिवींत’ या मोहिमेला यश येताना दिसत आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी तसेच वेगळ्या प्रकारची ही मोहीम आरोग्य खाते तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून राबविण्यास सुरुवात झालेली आहे. या मोहिमेचा उद्देश यशस्वी होत असल्याने गेल्या महिन्याभरात गोमेकॉत दोघा तऊणांचे अवयव दान करून प्रथम ओडिशा आणि आता केरळ या दोन्ही राज्यातील कुटुंबियांनी आदर्श घालून दिलेला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, आरोग्य खाते आणि गोमेकॉद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘गोंय नवे जिवींत’ या मोहिमेची जागृती सरकारद्वारे सुरू आहे. केरळच्या कुटुंबाने आपल्या 22 वर्षीय साहिल मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन मानवतेचे कार्य केले आहे. 22 वर्षीय साहील हा मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करीत होता. त्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणताही विचार न करता अवयव दानाचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद तर आहेच. परंतु या सेवाभावी कार्याची कशाशीही तुलना होणे अशक्य आहे. काही दिवसांपूर्वीच डिचोली येथे कामगार म्हणून काम करीत असलेल्या एका तऊणाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या ओडिशा येथील कुटुंबियांनी घेतला होता. आता केरळ येथील कुटुंबियांनीही अवयव दानासाठी पुढे येत साहील या तऊणाचे अवयव दान करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. याची प्रक्रिया गोमेकॉत सुरू झाल्याचेही मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
दात्यांच्या कार्याचा विसर पडू देणार नाही : राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत विश्वगुरू म्हणून उदयास येत आहे. त्यांच्याच दृष्टीकोनातूनच गोव्यात ‘गोंय नवे जिवींत 2025’ ही मोहीम राबविण्यास सुरवात केली आणि आता ह्या मोहिमेला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गोव्यात अवयव दान केलेल्या ओडिशा आणि केरळ येथील दोन्ही कुटुंबियांना देवाने आशीर्वाद देवोत, तसेच आम्हीही त्यांच्या या कार्याचा कधीच विसर पडू देणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.