केरळ, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली विजयी
वृत्तसंस्था, रांची (झारखंड)
2026 च्या हॉकी हंगामातील येथे सुरु असलेल्या हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत केरळ, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, दिल्ली यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित विजयी सलामी दिली.
रविवारी या स्पर्धेतील क विभागातील झालेल्या ब गटातील सामन्यात पुडुचेरीने राजस्थानचा 10-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात पुडुचेरी संघातील ज्ञानेश्वरी गिराकाने 4 गोल तर चंचलने 3 गोल नोंदविले. क विभागातील ब गटातील झालेल्या सामन्यात केरळने तेलंगणाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. केरळतर्फे परमेश्वरीने 2 तर निरंजना आणि कर्णधार रेश्मा समाद यांनी प्रत्येकी 1 गोल केला. गट अ आणि गट 2 च्या गुणतक्त्यात गोवा आणि जम्मू काश्मिर यांनी आघाडीचे स्थान मिळविले आहे.
विभाग ब मधील ब गटातील झालेल्या सामन्यात चंदीगडला उत्तराखंडने 2-2 असे बरोबरीत रोखले तर ब गटातील अन्य एका सामन्यात हिमाचल प्रदेशने कर्नाटकाचा 3-1 असा पराभव केला. हिमाचाल प्रदेशतर्फे शानवी शर्माने 2 तर आरुशीने 1 गोल केला. कर्नाटकातर्फे एकमेव गोल सरस्वतीने नोंदविला. अ गटातील अन्य एका सामन्यात तामिळनाडूने आसामचे आव्हान 5-1 असे संपुष्टात आणले. रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीने दादरा आणि नगर हवेली व दमन दीव संघाचा 2-1 असा पराभव केला.