केरळचे राज्यपाल आर्लेकर यांचा गोवा राज्यपालांकडून सन्मान
गोमंतकीय पारंपरिक समई, तुळशीची माळ दिली भेट
पणजी : गोमंतकीय सुपूत्र राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर केरळचे सुपूत्र तथा गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आर्लेकर यांना दोनापावला येथील राजभवनावर सौजन्य भेटीसाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार केरळचे राज्यपाल आर्लेकर यांनी गोव्यात येऊन पिल्लई यांची काल बुधवारी भेट घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पारंपरिक समई, तुळशीमाळ, कुणबी शाल, पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल पिल्लई यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही राज्यपालांच्या या सौजन्य भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी पिल्लई यांनी केरळबाबत आणि तेथील लोकजीवन याविषयी आर्लेकर यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. केरळचे पर्यटन आणि अर्थव्यवस्था याबाबतही पिल्लई यांनी आर्लेकर यांना मार्गदर्शन केले.
केरळ हे गोव्यासारखेच राज्य असल्याने या ठिकाणी ऊजणे आणि स्थानिकांशी जुळवून घेणे फार अवघड जाणार नसल्याचेही आर्लेकर म्हणाले. गोव्याप्रमाणे केरळ देखील माझाच आहे. मी तिथे कुणाला शिकवायला किंवा आज्ञा द्यायला चाललो नाही. तेथील सरकारला त्यांच्या कामात मदत करण्यास मी चाललो आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यपाल पिल्लई म्हणाले की, आर्लेकर ही अभ्यासू आणि संविधानाला कटिबद्ध असलेली व्यक्ती आह. ते सर्वांना न्याय देतील अशी मला खात्री आहे. त्यांची नियुक्ती केरळसाठी एक भेट ठरणार आहे. गोवा आणि केरळमध्ये अनेक गोष्टीत साम्य आहे. माझ्या काळात मी गोवा राजभवनला लोकभवन करण्याचा प्रयत्न केला. लवकरच आम्ही राजभवनद्वारे गरजू लोकांना अन्न आणि कपडे देण्याचा विचार करत आहोत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाची ऑफर नव्हतीच : आर्लेकर
मला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची कोणतीही ऑफर नव्हती. गोव्याच्या कोणत्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत मी नाहे. मी गोव्यात येणार ही केवळ अफवा होती. केरळच्या राज्यपालपदी निवड झाल्याने ती केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे, असे केरळचे नवनिर्वाचित राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. राज्यपाल पिल्लई हे मूळचे केरळचे असल्याने मी त्यांच्याशी केरळबाबत चर्चा केली. राज्यपाल या नात्याने त्यांचे गोव्यातील विविध घटनांकडे लक्ष आहे. त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही, असे आर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.