कोकणामध्ये 'केरा केरलम' जातीचे नारळ वाण बहरणार...
रत्नागिरी :
कोकणात 'केरा केरलम' हे नारळाचे वाण अधिक उत्पादन देत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये यांच्या प्रयोगाच्या निष्कर्षाअंती आढळून आले आहे. या नारळाची वैशिष्ट्ये प्रति माड प्रतिवर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन असून खोबरे प्रतिनारळ १७० ग्रॅम आहे. तर तेलाचे प्रमाण ६९ टक्के इतके असल्याने त्याच्या उत्पन्नात सातत्य दिसून आले आहे. त्यामुळे 'केरा केरलम' या नारळ लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये या वाणाच्या नारळ लागवडीस शिफारस करण्यात आली आहे. हे वाण शिफारसीत करण्याच्या संशोधन कार्यात डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. किरण मालशे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे आणि डॉ. पराग हळदणकर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
नारळाला 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखले जाते. हे पीक जगभरातील ९० हून अधिक देशांमध्ये घेतले जाते. भारत हा जगातील एक प्रमुख नारळ उत्पादक देश आहे. एकूण जागतिक उत्पादनाच्या ३१ टक्के उत्पादन भारतात होते. सुमारे २१.९० लाख हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड असून २१,२०७ दशलक्ष नारळांचे उत्पादन होते. भौगोलिक क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी उत्पादनात तो प्रथम क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रामध्ये नारळाचे उत्पादन मुख्यत्वे कोकण किनारपट्टीवर घेतले जाते. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नारळ लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. अलिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातही नारळ लागवडीचा विस्तार होत आहे. कोकणात पारंपरिकरित्या 'बाणवली' या उंच नारळाची लागवड केली जाते. नारळाचा उपयोग शहाळे, ओले खोबरे, तेल काढणे आणि काथ्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात होतो.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे सन २०११ पासून भारतामध्ये विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू करण्यात आला होता. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, 'केरा केरलम' हे नारळाचे वाण अधिक उत्पादन देणारे आणि आशादायी असल्याचे दिसून आले.