केंट आरओसह इतर आयपीओ लांबणीवर
पश्चिम आशियाई तणावाच्या स्थितीमुळे निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील वॉटरप्युरीफायर निर्माती कंपनी केंट आरओ यांचा आयपीओ आणण्याचा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. सध्याला पश्चिम आशियाई क्षेत्रात असणारा तणाव व बाजारातील डळमळीत स्थिती लक्षात घेता कंपनी आयपीओचे सादरीकरण लांबणीवर टाकण्याचा बेत आखत आहे. यासोबत फोन पे, जियो यांचाही आयपीओ लांबणार असल्याचे बोलले जात आहे. इराण व अमेरिकेत वाढलेला तणाव, जागतिक बाजारातही असलेली निराशादायी स्थितीचा विचार केंट आरओ यांनी केलेला आहे. हाँगकाँगपासून ते लंडनसारख्या जागतिक शेअरबाजारातही नव्या आयपीओंच्या लाँचिंगला ब्रेक लागल्याचे समोर आले आहे.
ही एकच कंपनी आपला आयपीओ लांबवत आहे असं नाही तर यात वॉलमार्टची फोन पे यांनीही आयपीओला ब्रेक दिला आहे. तर रिलायन्सच्या जियो प्लॅटफॉर्म्सचा आयपीओही लांबणीवर पडणार आहे. केंट आरओ यांच्या आयपीओबाबत विचार केल्यास मागच्या जूनमध्ये नियामकाने त्यांना आयपीओ सादरीकरणाला हिरवा कंदील दाखवला होता. आयपीओअंतर्गत सध्याच्या समभागधारकांकडून ऑफर फॉर सेलअंतर्गत समभाग विक्री केले जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
काय म्हणाले चेअरमन
यासंदर्भात चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक महेश गुप्ता यांनी आम्हाला आयपीओ सादरीकरणाची घाई नसल्याचे म्हटले आहे. सध्याला बाजारात अस्थिर स्थिती आहे. इराण युद्धाचे वातावरण निवळायचे नाव घेत नसल्याने आयपीओ सादर करण्याची योजना लांबणीवर टाकणे रास्त वाटते आहे. येणाऱ्या काळात स्थितीत सुधारणा पूर्णपणे झाल्यास आयपीओ लाँच करण्याचा विचार केला जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम वाहतूक, धातू व प्लास्टिक खर्चावर होत असल्याने त्याचे परिणाम केंटवर दिसून येत आहेत. केंट आरओ ही कंपनी 15 टक्के इतका कच्चा माल आयात करते.
जियो आयपीओ लांबणीवर
तिकडे बहुचर्चित रिलायन्सच्या जियोच्या आयपीओलाही उशीर होतो आहे. रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण बैठक 19 जून रोजी होत असून यात आयपीओ सादरीकरणाबाबत चित्र स्पष्ट होईल असे म्हटले जात आहे.
आयपीओ प्रतिक्षेत...
फोन पे : कंपनी आपला आयपीओ आणणार असून सध्याच्या अस्थिर वातावरणात तो पुढे ढकलण्यात आला आहे. कंपनी आयपीओतून 11 हजार ते 13 हजार 500 कोटी रुपये उभारणार आहे. संपूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत आयपीओ सादर होईल. 12 अब्ज डॉलर्स ते 15 अब्ज डॉलर्सवर मूल्य नेण्याचे उद्दिष्ट आहे.
जियो प्लॅटफॉर्म्स : कंपनीचा आयपीओ कधी येणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. भारतीय इतिहासात सर्वाधिक मूल्याचा आयपीओ आणण्याचे प्रयोजन आहे. 33 हजार ते 50 हजार कोटी रुपये आयपीओतून उभारण्यात येणार आहेत. यानंतर कंपनीचे मूल्य 130 ते 170 अब्ज डॉलर्स इतके करण्याचे लक्ष्य आहे.