For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांचा ‘प्रचार’ धडाका सुरू

06:42 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांचा ‘प्रचार’ धडाका सुरू
Advertisement

सर्वप्रथम मोदी-शहांवर निशाणा : त्यानंतर रोड-शोमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी शनिवारपासून प्रचाराचा धडाका सुरू केला. सकाळच्या सत्रात विविध ठिकाणी देवदर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर दुपारी त्यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. तसेच दुपारनंतर भव्य रोड शोमध्ये सहभागी होत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर सभेलाही संबोधित केले.

Advertisement

केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी पॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात पोहोचले. यादरम्यान त्यांनी हनुमानजीसमोर डोके टेकवून प्रार्थना केली. येथून निघाल्यानंतर त्यांनी जवळचे शनी मंदिर आणि नवग्रह मंदिरही गाठले. यानंतर केजरीवाल आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले. याप्रसंगी यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संदीप पाठक, संजय सिंग, आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन, एनडी गुप्ता हेही उपस्थित होते. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या मुख्यालयात जोरदार तयारी करण्यात आली होती. मी तुऊंगातून थेट तुमच्यामध्ये आलो आहे, असे केजरीवाल कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. तुमच्यामध्ये राहून छान वाटते. मला दिल्लीकरांची खूप आठवण येते. करोडो लोकांनी प्रार्थना केल्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच काल एक चमत्कार घडला आणि आज मी तुम्हा सर्वांमध्ये आलो आहे, असे भावुक विधान त्यांनी केले.

मेहरौलीमध्ये रोड शो

पक्ष मुख्यालयातील पत्रकार परिषदेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे रोड शो केला. पक्षाचे उमेदवार सहिराम पहेलवान यांच्या बाजूने मेहरौली येथे रोड शो आयोजित करण्यात आला होता. पहिल्या रोड शोची वेळ दुपारी 4 वाजता निश्चित करण्यात आली. या लोकसभा निवडणुकीतील केजरीवाल यांचा हा पहिलाच रोड शो ठरला. याशिवाय पूर्व दिल्लीतील आप उमेदवार कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ कृष्णा नगरमध्ये रोड शो देखील करणार आहेत. केजरीवाल यांच्यासोबत भगवंत मान यांच्यासह पक्षाचे सर्व मोठे नेते मेहरौली येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

‘एक राष्ट्र, एक नेता’ धोरण

मुख्यालयातील पत्रकार परिषदेत केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी अतिशय धोकादायक मोहीम चालवली आहे. ‘वन नेशन, वन लीडर’ अर्थात ‘एक राष्ट्र, एक नेता’ असे या मिशनचे नाव आहे. या अंतर्गत मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे. ही मोहीम ते दोन पातळ्यांवर चालवत आहेत. एकीकडे सर्व विरोधी नेत्यांना तुऊंगात पाठवायचे आणि दुसरीकडे भाजपच्या जेष्ठ नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांना तुऊंगात पाठवण्यात आले. हेमंत सोरेन यांची तुऊंगात रवानगी करण्यात आली. तसेच ममता दीदींच्या अनेक मंत्र्यांना तुऊंगात पाठवले, स्टॅलिनच्या मंत्र्यांना तुऊंगात पाठवले. त्यानंतर आता त्यांना पुन्हा निवडून दिल्यास ममतादीदी, तेजस्वी यादव, स्टॅलिन, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरे हेही तुऊंगात जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले.

...ही ‘हुकुमशाही’ प्रवृत्ती!

मोदींनी भाजपचा एकही नेता सोडला नाही. अडवाणी, मुरली मनोहर, सुमित्रा महाजन यांना राजकारणातून संपवले. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत पक्षाला जिंकून देणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांनाही बाजूला टाकले. वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर, रमणसिंग यांचीही तशीच अवस्था आहे. आता पुढचा क्रमांक योगी आदित्यनाथ यांचा आहे. जर ते निवडणूक जिंकले तर येत्या दोन महिन्यात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदलतील. ही ‘हुकुमशाही’ प्रवृत्ती असून देशात ‘वन नेशन, वन लीडर’ अंतर्गत केवळ एकच नेता उरणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला.

आज आमदारांची बैठक, अजेंड्यावरून सस्पेन्स

तुऊंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी आपली राजकीय सक्रियता अधिक तीव्र केली आहे. ते रविवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मोठ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आम आदमी पार्टीची एक मोठी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच दिल्लीत ही बैठक बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. ते दिल्लीतील सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. तिहार तुऊंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही पहिलीच मोठी बैठक आहे.

Advertisement
Tags :

.