केजरीवालांच्या घरचा पत्ता बदलला
लुटियन्स दिल्लीतील बंगल्यात स्थलांतर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरचा पत्ता शुक्रवारपासून बदलला आहे. लुटियन्स दिल्लीतील बंगला क्रमांक 5 हे त्यांचे नवे निवासस्थान असणार आहे. केजरीवाल हे स्वत:च्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यात राहण्यासाठी आले आहेत. हा बंगला आम आदमी पक्षाच्या मुख्यालयानजकी आहे. प्रत्यक्षात हा बंगला आप राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांना देण्यात आला होता. यापूर्वी केजरीवाल हे उत्तर दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थानात राहत होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याचमुळे केजरीवालांना मुख्यमंत्री निवासस्थान सोडावे लागले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानात केजरीवाल हे पत्नी, मुले आणि आईवडिलांसोबत राहत होते. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्याप्रकरणी केजरीवाल हे टीकेचे धनी ठरले होते.
तिहार तुरुंगातून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत केजरीवालांनी सर्वांना चकित केले होते. घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल हे 5 महिन्यांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिले आहेत. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेकडून प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र मिळाल्यावरच मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केजरीवालांनी केली आहे.
सिसोदियांनीही सोडला बंगला
तर माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनी मथुरा रोडवरील शासकीय एबी-17 बंगला सोडला आहे. मार्च 2023 मध्ये अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणीच सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना नवे निवासस्थान अद्याप मिळालेले नाही. आतिशी यांना अलिकडेच झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आतिशी या मथुरा रोडवरील शासकीय बंगल्यात राहू शकतात किंवा मुख्यमंत्री निवासस्थानाची निवड करू शकतात.