केजरीवालांच्या कोठडीत 11 सप्टेंबरपर्यंत वाढ
दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरण : आप नेत्याला झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. केजरीवालांना मंगळवारी राउज अॅव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेथे सीबीआयच्या मागणीनुसार केजरीवालांची कोठडी न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.
राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयकडून दाखल चौथ्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक, विनोद चौहान, आशीष माथूर आणि सरथ रे•ाr विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने पाचही आरोपींना समन्स जारी केला आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली आहे.
सीबीआयने केजरीवालांना 26 जून रोजी अटक केली होती. केजरीवाल हे सध्या न्यायालयीत कोठडीच्या अंतर्गत दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहेत. तर अबकारी धोरणाशी निगडित ईडीकडून नोंद गुन्ह्याप्रकरणी केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 21 मार्च रोजी अटक केली होती.