ई-20 इंधनाविरोधात केजरीवाल काढणार मोर्चा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोल पंपांवर ग्राहकांना शुद्ध पेट्रोल आणि ई-20 यापैकी कोणतेही एक निवडण्याचा पर्याय दिला पाहिजे अशी मागणी करत वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याची तयारी दर्शवली आहे. आपली ही मागणी पूर्ण न झाल्यास 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात येईल, असे केजरीवाल यांनी शनिवारी जाहीर केले. ई-20 इंधनाच्या मुद्यावर ‘नॅशनल टाऊन हॉल’मध्ये केजरीवाल यांनी हे विधान केले. जर इथेनॉल फायदेशीर नसेल, तर त्याचा प्रचार का केला जात आहे? सरकार हे नागरिकांवर का लादत आहे? असे प्रश्नही केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.
दिल्लीत आयोजित ‘राष्ट्रीय टाऊन हॉल’मध्ये अनेक राज्यांतील लोकांनी भाग घेत ई-20 बाबतचे त्यांचे अनुभव तसेच त्यांना त्यांच्या वाहनांसंबंधी येत असलेल्या समस्यांबद्दल भाष्य केले. याचवेळी केजरीवाल यांनीही 3 ऑगस्टच्या दुपारपर्यंत आपण मागण्या मान्य होण्याची प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 4 ऑगस्टला सुमारे 100 लोकांसोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.