केजरीवाल अटकेविरोधात न्यायालयात
कारागृहातून सरकार चालविण्याची तयारी : रालोआकडून अटकेचे समर्थन, विरोधकांचा विरोध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या गाजलेल्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) अटक केल्यानंतर, त्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सादर केली आहे. आपली अटक बेकायदेशीर आहे, असे प्रतिपादन त्यांनी याचिकेत केले आहे. केजरीवाल यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती.
मद्यव्यापाऱ्यांना आणि उत्पादकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देईल असे धोरण केजरीवाल यांच्या सरकारने दोन वर्षांपूर्वी आणले. त्या मोबदल्यात या सरकारने मद्यसम्राटांकडून मोठ्या प्रमाणात किकबॅकस् किंवा लाच स्वीकारली. आम आदमी पक्षाचे मंत्री आणि मोठे नेते या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल हे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. लाचेपोटी किमान 125 कोटी रुपये स्वीकारण्यात आले आहेत. या रकमेपैकी 45 कोटी रुपये 2022 मध्ये गोवा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आले आहेत, असे अनेक आरोप ईडीने केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ठेवले आहेत.
तेलंगणापर्यंत लागेबांधे
याच प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांनाही काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्या सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा कोणीही दिलेला नाही. आम आदमी पक्षाने हा आरोप फेटाळला आहे.
कारागृहात सरकार ?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी कारागृहातून सरकार चालविण्याची तयारी चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी दिल्लीच्या तिहार कारागृहात कार्यालय स्थापन करण्याची अनुमती आम आदमी पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. तथापि, कारागृहातून सरकार चालविणे शक्य होणार नाही. कारण तशी अनुमती मिळू शकत नाही, असे विधीतज्ञांचे म्हणणे आहे.
पत्नीकडे सूत्रे सोपविणार
कारागृहातून सरकार चालविता न आल्यास मुख्यमंत्रिपदाची सूत्रे केजरीवाल त्यांची पत्नी सुनीता यांच्याकडे सोपवू शकतात, अशीही चर्चा आहे. सुनिता केजरीवाल यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत, अशीही माहिती आहे. त्यांनी प्रशासकीय कामकाजात लक्ष घालण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सुनीता यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन करून केजरीवाल यांचे म्हणणे स्पष्ट केले. कोणत्याही पुराव्याविना अरविंद केजरीवाल यांना अटक केली असल्याचा आरोप त्यांनी या परिषदेत केला आहे.
केजरीवालच उत्तरदायी
केजरीवाल यांनी त्यांच्या कृतीमुळे आणि स्वभावामुळे ही वेळ स्वत:च त्यांनी स्वत:वर आणली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. ज्याअर्थी न्यायालयाने त्यांना अनेकदा प्रयत्न करूनही जामीन दिलेला नाही. यावरून त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी उगाचच कांगावा करू नये. त्यांचे भवितव्य आता न्यायालयात ठरवेल, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. या पक्षाच्या सर्व मोठ्या नेत्यांनी अटकेचे समर्थन केलेले आहे.
विरोधक पाठीशी
केजरीवाल हे विरोधी पक्षांच्या आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना अटक करून केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. केजरीवालांच्या विरोधात एकही पुरावा नाही. मद्यधोरण घोटाळा हे केंद्र सरकारने रचलेले कुभांड आहे. केजरीवाल मंत्रिमंडळातील दोन मंत्री कारागृहात आहेत. त्यांना गेले अनेक महिने जामीनही मिळालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना शक्तीहीन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
पैसा भाजपकडेच
मद्यधोरण घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाला मिळाला नसून तो भारतीय जनता पक्षालाच मिळाला आहे, असा सनसनाटी आरोप दिल्लीच्या मंत्री आतीशी यांनी केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपींने अवैधरित्या पैसा मिळविलेला होता. त्याने तो भारतीय जनता पक्षाला दिला. आता तोच आरोपी आमच्या विरोधात साक्ष देण्यास तयार झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाने हा आरोप विकृत असल्याची टीका केली आहे.
कार्यकर्त्यांची निदर्शने
केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत शनिवारी सकाळी निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. खोटे आरोप करून आम आदमी पक्षाला संपविण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली. काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट आदी पक्षांनीही केजरीवाल यांच्या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
नाट्यामय घडामोडी
ड केजरीवाल राजीनामा देणार नाहीत, असे आम आदमी पक्षाचे प्रतिपादन
ड केजरीवालांची अटक हा लोकशाहीला धोका : विरोधी नेत्यांची प्रतिक्रिया
ड केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
ड ईडीनंतर आता सीबीआयही केजरीवाल यांचा ताबा घेण्यासाठी तयारीत