भारतात केजरीवालांना जामीन, मी तुरुंगातच
इम्रान खान यांनी मांडली व्यथा : पाकिस्तानात अप्रत्यक्ष स्वरुपात मार्शल लॉ
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत सामील झाले. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानात अप्रत्यक्ष स्वरुपात मार्शल लॉ लागू असल्याचा आरोप केला. देशात सार्वत्रिक निवडणुकीच्या 5 दिवसांपूर्वी मला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवत मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा इम्रान यांनी केला. यादरम्यान इम्रान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही उदाहरण दिले. केजरीवालांना भारतात निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता असा उल्लेख त्यांनी केला.
खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याप्रकरणी इम्रान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नजराणा प्रकरणी मला गोवण्यात आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एनएबीचा (नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो) नवा अध्यक्ष नियुक्त करावा. सरकार आणि विरोधी पक्षामध्ये एनएबी अध्यक्ष नियुक्त करण्यावर सहमती होत नसल्यास थर्ड अम्पायरने यावर निर्णय घ्यावा असे इम्रान यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने इम्रान यांना एनएबीवर विश्वास नाही का अशी विचारणा केली. यावर इम्रान यांनी एनएबीने निवडणुकीच्या 5 दिवसांपूर्वी माझ्यासोबत जे केले, ते पाहता त्यावर विश्वास कसा ठेवावा अशी टिप्पणी केली. एनएबीच्या चौकशीला मी अद्याप सामोरा जात आहे. परंतु एनएबीच्या कार्यपद्धतीत सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानात भ्रष्टाचारावर कारवाई करणारी संस्था नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोचे अधिकार कमी करण्यासाठी एक कायदा 2002 मध्ये लागू करण्यात आला होता. याच्या अंतर्गत एनएबी 50 कोटीपेक्षा कमी भ्रष्टाचार झालेल्या प्रकरणी तपास करू शकत नव्हते. तसेच या कायद्याच्या अंतर्गत एनएबीच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीत राष्ट्रपतींचे असलेले अधिकार संपुष्टात आणले गेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील बदलांना अवैध घोषित केले होते. याकरता इम्रान खान यांच्या पक्षानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती.